आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येसगाव प्रकल्पाच्या नव्या चारीस पाणी; चार लाख 20 हजारांची मंजुरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खुलताबाद- शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव प्रकल्पातील तिन्ही विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी शहराला आता चार दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. पालिकेने प्रकल्पातील बुडीत क्षेत्रात चारीचे खोदकाम सुरू केले असून यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी चार लाख 20 हजार रुपये मंजूर केले आहेत. या चारीला 15 फुटांवर पाणी लागले आहे. यातून पंपहाउसद्वारे खुलताबाद शहराला पाणीपुरवठा होणार आहे. प्रकल्प निर्मितीपासून यंदा प्रथम येसगाव प्रकल्प आटला आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून खुलताबाद शहराला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. चुकीच्या पैसेवारीमुळे तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आलेला नाही. खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणार्‍या येसगाव प्रकल्पाला जिल्हाधिकारी यांनी महिनाभरापूर्वी भेट देऊन येथील विहिरींची पाहणी केली. त्या वेळी येथे चारी घेण्याचे आदेश दिले होते. नुकताच चारी खोदण्याचा प्रस्ताव मंजूर झाला असून प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात चारी खोदण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. खुलताबाद शहराची लोकसंख्या सुमारे 25 हजारांवर असून पालिकेच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी 18 लाख लिटर पाण्याचा पुरवठा होत होता, परंतु मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने येसगाव प्रकल्पात कमी साठा होता. त्यामुळे शहराला आता 9 लाख लिटर पाण्याचा पुरवठा होत असल्याने आता एक दिवसाआड येणारे पाणी चार दिवसांआड येत आहे.