पाटोदा - पैशाच्या व्यवहारातून चार मित्रांनी दुसऱ्या मित्राचा दगडाने ठेचून खून करत त्याचा मृतदेह उस्मानाबाद जिल्ह्यातील ईट-पाथरूड मार्गावरील घाटात फेकून दिल्याची खुनाची घटना शुक्रवारी पाटोदा येथे उघडकीस आली आहे. जालिंदर भाऊसाहेब जाधव (२५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी पाटोदा येथील व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून दिवसभर कडकडीत बंद पाळला.
पाटोदा येथून उस्मानाबादला तरुणाला जीपमधून नेतानाचा प्रसंग नगर रोडवरील दुर्गा हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिस आरोपीपर्यंत पोहोचू शकले. पाटोदा शहरातील माऊलीनगर भागातील रहिवासी जालिंदर जाधव हा तरुण पानटपरी चालवत होता. २२ फेब्रुवारी २०१७ रोजी पाटोदा शहरातून तो अचानक बेपत्ता झाला होता.
त्याच्या कुटुंबातील लोकांनी शोध घेऊनही तो सापडत नसल्याने त्याचे वडील भाऊसाहेब जाधव यांनी २३ फेब्रुवारी रोजी पाटोदा पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनी संशयावरून पांडुरंग सुग्रीव कोठुळे, विठ्ठल सुग्रीव कोठुळे (रा. जवळाला ता. पाटोदा) व पांडुरंग मंजेराम खेडकर (रा. थेरला) या तीन तरुणांना ताब्यात घेतले. यातील अन्य एक आरोपी तरुण फरार आहे.
पैशाची देवाणघेवाण
मृत जालिंदर जाधव याने पांडुरंग कोठुळे याला पाच लाख रुपये उसने दिले होते. २२ फेब्रुवारी रोजी चुंभळी येथे जालिंदर याला हे पैसे परत दिले जाणार होते. पैसे देतो म्हणून चार जणांनी त्याला जीपमध्ये बसवून नगर रोडवरील शेतात नेत त्याचा खून केला.
२ दिवसांत दुसरा खून
पाटोदा तालुक्यातील सौंदाना येथे पैशाच्या व्यवहारातून २२ फेब्रुवारी २०१७ रोजी विनोद भीमराव वाघमारे (२५) या तरुणाचा चाकूने भोसकून खून केला झाला होता. खुनाची ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना समोर आली आहे.