आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोण्यासाठी युवकाचे अपहरण, आईच्या सतर्कतेने टळला नरबळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- गुप्तधनाच्या लालसेने युवकाचे अपहरण करून नरबळी देण्याचा प्रयत्न मुलाच्या आईच्या सतर्कतेने टळला. बदनापूर तालुक्यातील विल्हाडी शिवारात गुरुवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. यातून सुटका झाल्यानंतर संबंधित मुलानेच हा प्रकार सांगितल्याने खळबळ उडाली. गंभीर प्रकार घडला असतानाही बदनापूर पोलिसांनी मात्र केवळ अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

बदनापूर तालुक्यातील हिवरा येथील उमेश गोपीनाथ टेकाळे (२५) यास मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गावातीलच एक जण दुचाकीवर बसवून घेऊन गेला. हा प्रकार त्या मुलाची आई सुमनबाई यांनी पाहिला. मात्र दुचाकीस्वार हा गावातीलच असल्याने त्यांनी त्यास हटकले नाही. त्यानंतर गुप्तधनाच्या लालसेने जादूटोणा करण्यासाठी दुचाकीवर त्यास घेऊन जाणाऱ्या व्यक्तीसह अन्य चौघांनी उमेश यास विल्हाडी गावाच्या शिवारातील घरात कोंडून ठेवले. चौघांनी गुप्तधनासाठी पूजा मांडण्याचा प्रयत्न केला. तेथे रिंगण तयार केले होते त्यात लिंबू-मिरची, कुंकू पूजेच्या इतर काही वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, रात्री ११.३० पर्यंत मुलगा उमेश घरी आल्याने त्याची आई सुमनबाई या उमेश यास दुचाकीवर बसवून घेऊन जाणाऱ्या गावातीलच संबंधित व्यक्तीच्या फोनवर वारंवार फोन करीत होत्या. उमेश आपल्यासोबत आहे हे त्याच्या आईला समजले आहे ही गोष्ट लक्षात आल्याने संबंधितांनी त्यास रात्री उशिरा घरी नेऊन सोडले. दरम्यान, दोषींवर नरबळीचा गुन्हा दाखल करण्यात यावा; अन्यथा पोलिस ठाण्यासमोर उपोषण करणार असल्याचे युवकाची आई सुमनबाई गोपीनाथ टेकाळे यांनी सांगितले.

तक्रार मागवून घेणार
विल्हाडी शिवारात नेमके काय घडले याची माहिती घेऊन त्याबाबत सांगता येईल. त्यासाठी सोमवारी बदनापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकास जालना येथे बोलावून घेणार आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार यात आणखी कलमांची वाढ करता येईल. परंतु जादूटोण्याचा प्रकार आहे का याबाबत आताच काही सांगता येणार नाही.
-ज्योतिप्रिया सिंह, पोलिस अधीक्षक

तपासात निष्पन्न होईल
उमेशला दुचाकीवर बसवून अारोपीने अपहरण केल्याची तक्रार देण्यात आली आहे. आम्ही सुरेश दादाराव टेकाळे यास अटक केली असून त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हा जादूटोण्याचा प्रकार आहे का ते तपासादरम्यान निष्पन्न होईलच.
-एस.पी.चव्हाण, तपासी अंमलदार

दोषींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ
उमेशने ही सर्व हकीकत आईला सांगितल्यानंतर सुमनबाई यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बदनापूर पोलिस ठाणे गाठले. मात्र आरोपींना ताब्यात घेईपर्यंत गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले. शिवाय दुपारी बारा वाजता पोलिस ठाण्यात गेल्यानंतर सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचे मुलाच्या नातेवाइकांनी सांगितले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)