आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीला साद घालण्यासाठी तरुणाईची सायकल रॅली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दिवसभर सायकलवर प्रवास, गाव दिसताच चौकात पथनाट्याचे सादरीकरण, मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तनातून समाजप्रबोधन आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा हीच दिनचर्या. राज्यभरातील ३० युवक-युवतींची सायकल रॅली अकोल्याहून पंढरपूरला निघाली असून ६०० किलोमीटरच्या या प्रवासात विविध सामाजिक प्रकल्पांना भेटी देत हे तरुण मजल दरमजल करत आहेत.

अकोला येथील समर्पण प्रतिष्ठान आणि आळंदीच्या वेध ट्रस्टच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यांतील वेगवेगळ्या वयोगटातील युवक-युवती या रॅलीतून प्रबोधन करत माणुसकी जपण्याचा आणि वेदनेशी नाते जोडण्याचा संदेश देत आहेत. या उपक्रमाविषयी सांगताना समर्पणचे अध्यक्ष अमोल मानकर सांगतात, वाढता धार्मिक दहशतवाद, राजकीय धर्मांधता, जातीय हत्याकांड, स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबंदी, पर्यावरण रक्षण, भ्रष्टाचार, शिक्षणाचे बाजारीकरण, पाणीटंचाई असे अनेक प्रश्न आहेत; पण प्रश्नशून्य माणसांच्या गर्दीत हरवत चाललेला माणूस आणि त्याच्यातील माणुसकीचा शोध घेण्यासाठी हा प्रवास सुरू करण्यात आला. १६ जून रोजी अकोला येथून रॅलीची सुरुवात झाली. २८ जून रोजी पंढरपूर येथे समारोप होणार आहे.

प्रवासादरम्यान व्यक्तींच्या, सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटी हे युवक घेत असून त्यांचे मार्गदर्शन घेत आहेत. विविध प्रश्नांवर गीते, पथनाट्य, कीर्तन यातून प्रबोधन करतात. स्वामीराज भिसे यांच्या कीर्तनाने गावकरी अंतर्मुख हाेतात. शिरूर येथील शांतिवनाचे दीपक नागरगोजे, बालग्रामचे संतोष गर्जे, सेवाश्रमाचे सुरेश राजहंस यांच्या प्रकल्पांवर तरुणांनी भेटी दिल्या. या रॅलीत परभणीचे गजानन डोणे, मुकेश कलाल, हिंगोलीचे देवानंद शिंदे, नांदेडचे अमोल काळे, लातूरचे चंद्रकांत सूर्यवंशी, पुण्याची प्रज्ञा माळी, गीता कांबळे, नगरचे शुभम कडलग, ज्ञानेश्वर कानवडे, बीडची प्रेरणा चव्हाण, जालन्याची जयश्री भुतेकर, गजानन आव्हाळे आदी सहभागी झाले.

सायकल दान करणार
या प्रवासासाठी सायकल दान देण्यासाठी आम्ही आवाहन केले होते. त्यातून आलेल्या सायकलींवर प्रवास सुरू असून रॅली समाप्तीनंतर विविध सामाजिक संस्थांना प्रवास केलेल्या सायकली दान करण्यात येणार आहेत.
अमोल मानकर, समर्पण प्रतिष्ठान

या प्रवासात तरुणाईशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे."जरी वर्तमानाला कळेना आमुची भाषा विजा घेऊन येणार्‍या पिढ्यांशी बोलतो आम्ही' या सुरेश भटांच्या ओळी प्रेरणादायी आहेत. - प्रेरणा चव्हाण, सायकलयात्री
बातम्या आणखी आहेत...