आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गल्लीतील मुलीची छेड काढली म्हणून 9 जणांनी केली मारहाण, यासीनने घरी येऊन घेतला गळफास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर - गल्लीतील मुलींची छेड का काढली म्हणून नऊ जणांनी तरुणास शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीचा राग मनात धरून तरुणाने घराच्या पाठीमागील खोलीत पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
 
सय्यद यासीन सय्यद राैफ (२७, रा. कसबा गल्ली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून  त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नऊ जणांवर धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 
धारूरमधील कसबा विभागातील रहिवासी सय्यद यासीन हा  मिस्त्रीकाम करत  असून शुक्रवारी त्याने सुटी घेतल्याने तो कामावर गेला नव्हता. रात्री तो बसस्थानक परिसरात गेला  होता. तेव्हा त्या ठिकाणी काही तरुण आले. तू आमच्या गल्लीतील मुलींची छेड का काढलीस म्हणून नऊ जणांनी यासीन याला बसस्थानकात  शिवीगाळ करून मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. यासीन हा  रात्री तो घरी  आला नसल्याने कुटुंबातील लोक हैराण झाले.  

रात्री बसस्थानकातून यासीन हा आपल्या राहत्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या खोलीत गेला. या खोलीतील  आडव्या अँगलला दोरीने गळफास घेऊन  त्याने आत्महत्या केल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले होते.  सकाळी हा प्रकार  नातेवाइकांनी पाहिल्यानंतर एकच आक्रोश केला.  आत्महत्येचा प्रकार पाहून रौफ याच्या निवासस्थानी नागरिकांची  मोठी गर्दी झाली होती. त्यास मारहाण झाल्यानेच त्याने ही आत्महत्या केली असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी तरुणाचे  वडील सय्यद रौफ सय्यद महेबूब यांनी  यांनी धारूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आकाश शंकर वैरागे, शक्ती गालफाडे, लक्ष्मण वैरागे, विलास वैरागे, सुनील वैरागे यांसह अन्य चार अशा एकूण नऊ जणांवर यासीन याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिस्त्रीकाम करत होता यासीन   
सय्यद यासीन सय्यद रौफ याच्या कुटुंबात आई - वडिलांसह पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून तो वीटभट्टीवरील कामाबरोबरच मिस्त्रीकाम करत होता. शुक्रवारी नेहमीप्रमाणे तो सुटीवर होता. रात्री घरी आला नाही म्हणून कुटुंबीयांनी  त्याची शोधाशोध केली. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.

गुन्हा नोंद करण्यासाठी नातेवाईक आक्रमक   
सय्यद यासीन याला मारहाण करून त्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या नऊ जणांवर  गुन्हा नोंद  करण्यात यावा या मागणीसाठी  यासीन  याचे नातेवाईक आक्रमक झाल्याने धारूरमध्ये काही काळ  तणावाचे वातावरण  निर्माण झाले होते. आरोपींवर गुन्हा नोंद होईपर्यंत पंचनामा करू देणार नाही, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. शेवटी  पोलिस उपअधीक्षक मंदार वैद्य, निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी कुटुंबीयांची समजूत घातली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
बातम्या आणखी आहेत...