आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारसायकलच्या स्फोटात तरुण जखमी; तपास सुरू, एटीएस पथक येणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - दोन दिवसांपूर्वी उघडा महादेव मंदिराजवळ फायबरचे दरवाजे तयार करणा-या एका छोटेखानी कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर त्याच दुकानासमोर सोमवारी (दि. १३) दुपारी दोनच्या सुमारास मोटारसायकलचा स्फोट झाला. यात एक तरुण किरकोळ जखमी झाला. मात्र, यापूर्वी झालेल्या स्फोटाच्याच ठिकाणी पुन्हा स्फोट झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

कारेगाव रस्त्यावर असलेल्या उघडा महादेव मंदिर परिसरात फॅब-टेक या नावाने फायबरचे दरवाजे तयार करण्याचा घरगुती कारखाना असून तेथे शनिवारी (दि.११) हार्डनर नावाच्या केमिकलच्या डब्याचे झाकण उघडताना झालेल्या स्फोटात शेख शकील अब्दुल अजिज (३५) यांच्यासह त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यात त्यांच्या पत्नीलाही किरकोळ दुखापत झाली होती. या घटनेचा पोलिस तपास करीत असतानाच याच दुकानासमोर सोमवारी दुपारी स्प्लेंडर मोटारसायकलचा (एमएच २२ वाय ४३८९) स्फोट झाला.
दर्गा रस्त्यावरील शेख रसूल महेताब यांचेही वुडलँड फायबर डोअर या नावाने दुकान असून ते परवाच्या घटनेमुळे मोटारसायकलने सोमवारी दुपारी शेख शकील यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी फॅब टेक या दुकानासमोर गाडी उभी केली असता अवघ्या काही मिनिटांतच अचानक स्फोट झाला. त्या वेळी शेख रसूल हे गाडीच्या बाजूलाच उभे होते. या स्फोटात गाडीचा मागील अर्धा भाग चक्काचूर झाला. शेख रसूल यांच्याही हातापायांना जखमा झाल्या. त्यांना तातडीने येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, परवाच्याच ठिकाणी झालेल्या स्फोटामुळे पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक नियती ठाकर, सहायक पोलिस अधीक्षक प्रणय अशोक, एलसीबीचे निरीक्षक विवेक मुगळीकर, नवा मोंढाचे पोलिस निरीक्षक संजय हिबारे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवून गाडीचे व घटनास्थळावरील काही वस्तूंचे नमुने घेतले.

कारण जुजबी
सुरुवातीला या मोटारसायकलमध्ये काही केमिकल आणले असावे, असा अंदाज होता. त्यानंतर परवाच्या घटनेनंतर त्या दुकानातील सर्व केमिकल नष्ट करताना ते समोरील मोकळ्या जागेवर टाकले होते. मोटारसायकल दूर अंतरावरून आल्याने तिचे इंजिन गरम झालेले होते. त्या केमिकल व इंजिनाचा संपर्क आल्याने हा स्फोट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

फॉरेन्सिक लॅबसह एटीएसला पाचारण
घटनास्थळावरील नमुने फॉरेन्सिक लॅबला औरंगाबाद येथून, तर नांदेडच्या एटीएस पथकाला या घटनेची चौकशी करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. रहिवासी भागात महापालिकेने केमिकलचा वापर असलेल्या कारखान्यांना कशी परवानगी दिली, याबद्दल पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी आश्चर्य व्यक्त केले.