आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो लिटर पाणी, वीज वाचवणारे रामबाण तंत्र, वाॅटर लेव्हल इंडिकेटरचा तोडगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पाणी हेच जीवन, पाणी जपून वापरा, काटकसरीने वापरा अशा सूचना, संदेश आपण नेहमी वाचतो, प्रबोधनाच्या उपक्रमांपुरती चर्चा होते परंतु हेच पाणी मोठे बंगले, अपार्टमेंटच्या टाक्यातून ओव्हरफ्लो होऊन वाया जात असेल त्याचबराेबर बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा करण्यासाठी लागणारी वीज वाया जात असेल तर अशा संदेश, सूचनांना अर्थ राहत नाही. अनमोल पाणी व महागडी वीज वाया जाऊ नये म्हणून विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे यांनी वाॅटर लेव्हल इंडिकेटरचा तोडगा काढला आहे. अवघ्या दोनशे रुपये खर्चातून हे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले आहे. त्यामुळे पाण्याचा एक थेंबही अाणि विजेचे एक युनिटही वाया जाणार नाही असे युवा संशोधक भाऊसाहेब राणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. त्यांनी या तंत्राचा पहिला प्रयोग बीड शहरातील जालना रोडवरील लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये यशस्वी केला.

भाऊसाहेब राणे हे तालुक्यातील राैळसगाव केंद्राअंतर्गत तांदळवाडी घाट येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ते लक्ष्मी अपार्टमेंटमध्ये राहतात. तीन मजली या इमारतीत वाचमनने बोअरवेल सुरू केल्यानंतर पाण्याची टाकी ओव्हरफ्लो व्हायची. अापोआप शेकडो लिटर पाणी तसेच वीजही वाया जात होती. वाॅचमनला सूचना देऊनही तोच प्रकार पुन्हा पुन्हा घडत असे. त्याचबरोबर टाकी भरली अथवा नाही हे पाहणे वाॅचमनला शक्य नव्हते. तसेच ते त्रासदायक व धोकादायकही होते.
>वेळीच संदेश मिळाल्यानेे पाण्याचा थेंबही वाया जात नाही, विजेची बचत होते.
>पाणी टाकी २५,५०,७५ टक्के भरताच एलईडी संदेश वाॅचमन रूममध्ये मिळताे.
>टाकी शंभर टक्के भरताच बजरचा संदेश मिळाल्याने वाॅचमन सतर्क होतो.
>कमी खर्च जास्त फायदा देणा-या तंत्रामुळे माेठी बचत
>मोबाइलवर संदेश, टाकी भरली की बोअरवेलची मोटार बंद अशा सुविधा करता येतात परंतु ते अत्यंत खर्चिक आहे.
अवघ्या दाेनशे रुपयांच्या साहित्यातून सेन्सर तयार
भाऊसाहेब राणे यांनी आतापर्यंत शेतक-यांना उपयुक्त पिकांची राखण करणारा यंत्रमानव, शाळांना उपयुक्त ठरणारी पवनचक्की, अपघात टाळणारी एएमएस सिस्टिम, शिक्षकांसाठी हायटेक डिस्टर्ब, कार, वाहनांचे मायलेज वाढविणारी पेस पॅरलल इंजिन सिस्टिम तयार केली आहे. सलग दोन वेळा त्यांना केंद्र शासनाचा इन्स्पायर पुरस्कार तर राज्य शासनाचा उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
टाकाऊपासून बनवले सेन्सर
काॅपर वायर, प्लास्टिक बाटली, प्लास्टिक बाॅल, स्प्रिंग, ट्रान्सफार्मर, सहा व्होल्ट बॅटरी अादी साहित्यांपासून टाकी पूर्ण भरल्यानंतर सूचना देणारा सेन्सर तयार केला. हे संपूर्ण युनिट वाॅचमनच्या खोलीत स्थापित केले.