आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youth Tried To Suicide In Cabin Of Block Development Officer

गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात अपंग तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - हिवरा बुद्रुक येथील भारत निर्माण योजनेतील भ्रष्टाचाराबाबत तक्रार करूनही तीन महिन्यांपासून चौकशी करून कारवाई केली जात नसल्याने संतापलेला अपंग तरुण राजाभाऊ संपतराव वनवे याने शुक्रवारी सकाळी अकरा वाजता येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. युवकास येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिवरा बु. येथे भारत ग्रामीण जलस्रोत योजनेमार्फत ३९ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना सन २०१२ पासून सुरू असून तत्कालीन ग्रामसेवक व संबंधित गुत्तेदाराने गावात एक विहीर व पाण्याची टाकी केली. एवढे पैसे खर्च करूनही गावात पाणीटंचाई आहे. तेव्हा गावातील अपंग तरुण राजाभाऊ वनवे याने चौकशी केली असता यंत्रणेने त्याला कोणतीच माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे युवकाने माजलगावच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे २९ जानेवारी २०१५ रोजी तक्रार देऊन चौकशीची मागणी केली.

तीन महिने उलटले तरी पंचायत समितीने कुठलीची कार्यवाही केली नाही. त्यामुळे व्यथित झालेला राजाभाऊ शुक्रवारी सकाळी गटविकास अधिकारी ए. बी. गुंजकर यांच्या दालनात घुसला. त्यांच्यासोबत चर्चा करत असताना काहीच माहिती मिळाली नसल्याने बरोबर आणलेली कीटकनाशकाची बाटली प्राशन केली. त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सीसीटीव्ही बंद
अपंग तरुणाने २९ जानेवारी २०१५ रोजी निवेदन दिल्याची नोंद पंचायत समितीच्या आवक रजिस्टरला आहे; परंतु या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाला नऊ दिवसांनंतर म्हणजेच ९ फेब्रुवारी २०१५ रोजी निवेदन दिले. पंचायत समिती कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे मागील अनेक महिन्यांपासून बंद आहेत.

सुसाइड नोट
विष घेण्यापूर्वी राजाभाऊ याने एक सुसाइड नोट लिहिली होती. त्यात असे म्हटले होते की, आई, मी तुम्हाला सोडून जात आहे. मला गावचा बोगस कारभार करणारा अनिल कोकाटे हा धमकी देत होता, पाण्यासाठी तक्रार करू नकोस. गुत्तेदार अनिल कोकाटे हा पैशाच्या बळावर मला धमकी देत आहे. माझ्या आत्महत्येस तोच जबाबदार आहे.