आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Zilha Parishad Election In Maharashtra, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवडी: मिनी मंत्रालयावर काँग्रेसचे वर्चस्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना : भाजपचे जाधव अध्यक्ष, उपाध्यक्षपदी शिवसेनेचे खोतकर
जालना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे तुकाराम जाधव तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अनिरुद खोतकर यांची निवड झाली. ५५ सदस्य असलेल्या या जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युतीचे बहुमत आहे. रविवारी दुपारी झालेल्या या निवडणुकीत युतीच्या ३० सदस्यांसह चार अपक्ष सदस्यांनी युतीच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या तुकाराम जाधव यांनी राष्ट्रवादीचे पंकज बोराडे यांचा ३४ विरुद्ध १५ मतांनी पराभव केला तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर यांना ३४ तर राष्ट्रवादीचे अ‍ॅड. संजय काळबांडे यांना १५ मते मिळाली. या निवडणुकीत कांॅग्रेसच्या चार सदस्यांसह राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य गैरहजर होता. अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होताच युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

उस्मानाबाद : अध्यक्षपदी काँग्रेसचे अ‍ॅड. पाटील, गुंड उपाध्यक्ष
काँग्रेसचे अ‍ॅड. धीरज पाटील व राष्ट्रवादीचे मधुकर मोटे यांच्यात निवडणूक होऊन अ‍ॅड. पाटील विजयी झाले. पाटील यांना ३५ तर मोटे यांना १९ सदस्यांनी मतदान केले. उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सुधाकर गुंड व राष्ट्रवादीच्या सरस्वती पाटील यांच्यात लढत झाली. ३५ मते मिळून गुंड उपाध्यक्षपदावर विजयी झाले. निवडीच्या घोषणेनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे २०, राष्ट्रवादी १९, शिवसेना १३ आणि भाजपचे २ सदस्य आहेत.

लातूर : काँग्रेसच्या प्रतिभाताई अध्यक्ष, तर पाटील उपाध्यक्ष
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील कव्हेकर, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचेच अण्णासाहेब पाटील यांचा विजय झाला. स्पष्ट बहुमत असतानाही काँग्रेसने या निवडीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेची मदत घेतली. ५८ सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे ३५ सदस्य आहेत. मात्र काँग्रेसच्या विजयी उमेदवारांना ४१ मते पडली. भाजपकडून अध्यक्षपदासाठी मधू बिरादार तर उपाध्यक्षपदासाठी सविता शिंदे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यांना केवळ १३ मते पडली. मात्र काँग्रेसच्या विरोधात बंडाची भाषा करणा-या माजी आ. शिवाजी कव्हेकर यांनी विधानसभेची भीती दाखवून पत्नीसाठी हे पद मिळवले. त्यामुळे निष्ठावंतांपेक्षा बंडखोरांनाच भविष्यात पदे मिळतील, असा संदेश गेला आहे.

हिंगोली : शिवसेनेच्या लक्ष्मीबाई यशवंते अध्यक्षा, पतंगे उपाध्यक्ष
स्षष्ट बहुमत असलेल्या येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्याच लक्ष्मीबाई यशवंते तर उपाध्यक्षपदी रामेश्वर पतंगे यांची निवड झाली. या दोघांनीही काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा २८ विरुद्ध २१ अशा मतांनी पराभव केला. पक्षांतर्गत वाद चालू असलेल्या शिवसेनेत ही दोन्ही पदे डॉ. मुंदडा-घुगे गटाला मिळाली असून माजी खासदार वानखेडे गटाला सपशेल माघार घ्यावी लागली.
जिल्हा परिषदेत सहयोगी सदस्यांसह शिवसेनेचे २८ तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे २२ सदस्य आहेत. ओबीसी महिला प्रवर्गासाठी सुटलेल्या अध्यक्षपदाच्या आरक्षित जागेवर शिवसेनेत मोठी रस्सीखेच झाली होती. परंतु विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वाद न घालता माजी मंत्री डॉ. जयप्रकाश
मुंदडा, माजी आमदार गजानन घुगे यांची चर्चा झाली आणि मार्ग निघाला.

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर बिनविरोध
शिवसेनेच्या तटस्थपणामुळे राष्ट्रवादीच्या नाराज गटाला रविवारी निवडणुकीतून माघार घेण्याची वेळ आली. अपेक्षित संख्याबळ न जमवू शकल्यामुळे उमेदवारी अर्जही दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश उत्तमराव विटेकर हे अध्यक्षपदी तर राजेंद्र लहाने हे उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडले गेले.
अध्यक्षपदासाठी विटेकर तर उपाध्यक्षपदासाठी लहाने यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर दुपारी तीन वाजता
जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत त्यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. या वेळी सभागृहात ४० सदस्य उपस्थित होते. शिवसेनेने तटस्थ राहण्याचा व्हीप बजावल्याने पक्षाच्या ११ पैकी दोन सदस्यच सभागृहात उपस्थित होते.

नांदेड : अध्यक्षपदी मंगलाताई गुंडिले
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने महायुतीचा पराभव करीत अध्यक्ष व उपाध्यक्षपद काबीज केले. अध्यक्षपदी मंगलाताई गुंडिले, तर उपाध्यक्षपदी दिलीप धोंडगे यांची निवड करण्यात आली. आघाडीतर्फे मंगलाताई गुंडिले, तर महायुतीच्या वतीने जयश्री वाडीकर यांनी उमेदवारी दाखल केली. अध्यक्षपद अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव असल्याने दोनच अर्ज दाखल झाले. गुंडिले यांना ४६, तर वाडीकर यांना १७ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी आघाडीतर्फे दिलीप धोंडगे, तर महायुतीच्या वतीने लक्ष्मण ठक्करवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. धोंडगे यांना ४६, तर ठक्करवाड यांना १७ मते मिळाली.
(छायाचित्र: हिंगोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या लक्ष्मीबाई यशवंते (डावीकडून पहिल्या) यांची निवड झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तुकाराम कासार यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. )