आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प. कर्मचाऱ्यांचे १३ ला राज्यभर एकदिवसीय धरणे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी : राज्यातील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर वेळोवेळी आंदोलने झाल्यानंतर केवळ बैठकांचाच सोपस्कार करण्यात आला. प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे येत्या १३ डिसेंबर रोजी राज्यातील जिल्हा परिषदेचे कर्मचारी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. त्यानंतर १५ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचाही इशारा संघटनेने दिला आहे.

जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक डहाळे यांनी या मागण्यांसंदर्भातील निवेदन आमदार डॉ.राहुल पाटील यांना देऊन चालू हिवाळी अधिवेशनामध्ये लिपिकांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मागील नोव्हेंबर २०१५ मध्ये ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यानंतर १५ फेब्रुवारी २०१६ रोजी ग्रामविकास मंत्रालयात झालेल्या बैठकीतूनही काहीही साध्य होऊ शकले नाही.
३ मे २०१६ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनानंतर लिपिकांच्या ग्रेड पे करिता उपसचिव स्तरावर समिती नेमण्याचे ठरले होते. तशी घोषणाही आंदोलनस्थळी राज्यमंत्र्यांनी केली. मात्र, पुन्हा कार्यवाही शून्यच राहिली. परिणामी, १५ जुलैपासून राज्यातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केल्यानंतर आश्वासन देण्यात आले.
२१ जुलै रोजीदेखील झालेल्या बैठकीत काही प्रश्न मंजूर करण्यात आले. मात्र, त्याबाबतचे शासन आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वारंवार आंदोलने करूनही हाती काहीच पडत नसल्याने राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेने १३ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मागण्या मान्य न केल्यास १५ डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचाही इशारा दिला असून त्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशाराही संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश दाभाडकर, मुख्य सचिव बापू कुलकर्णी, मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक डहाळे यांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...