आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतविभाजन व चुरशीने झाली वाढ, परभणीमध्‍ये ग्रामपंचायतीप्रमाणे रंगली निवडणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिल्हा परिषदेची निवडणूक अगदी ग्रामपंचायत पातळीवर लढल्या जाणाऱ्या निवडणुकीप्रमाणे लढली गेली. तिरंगी, चौरंगी लढतीत मतविभाजनाची भीती, लक्ष्मीअस्त्राचा वारेमाप केला गेलेला वापर आदी कारणांमुळे मतदानाचा टक्का वाढला. परभणीत तब्बल ७४.४६ टक्के इतके मतदान झाले.   

जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक या वेळी प्रथमच कोणत्याही युती वा आघाडीविना झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या चार प्रमुख राजकीय पक्षांसह भाकप, माकप, घनदाट मित्रमंडळ, शेकापसारख्या पक्षांनीदेखील काही ठिकाणी उमेदवार उभे केले. चार प्रमुख राजकीय पक्षांनाही पूर्णच्या पूर्ण ५४ जागांवर उमेदवार देता आले नाहीत. राष्ट्रवादीने ५२, काँग्रेसने ४४, भाजपने ४८ तर शिवसेनेनेही ५० जागांवर उमेदवार उभे केले. काँग्रेसने काही जागा शेतकरी संघटनेला दिल्या. साहजिकच, प्रमुख पक्षांत ज्या ठिकाणी उमेदवार नव्हते, अशा ठिकाणी इतर पक्षांतील असंतुष्टांना सहजपणे सामावून घेतले गेले. राजकीयदृष्ट्या सर्वार्थाने तगडे असलेल्या या उमेदवारांनी निवडणुकीत चुरस निर्माण केली. बहुतांश ठिकाणी तिरंगी वा चौरंगी लढती झाल्या.  

मतदानाचा टक्का वाढण्यास अनेक कारणे कारणीभूत असली तरी अगदी गावपातळीवरच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेत सामावून घेऊन त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या. त्या त्या गावची सर्व प्रकारची जबाबदारी देताना अर्थकारणावरही भर देताना उमेदवारांनी या कार्यकर्त्यांना महत्त्व दिले. नात्यागोत्यांचे राजकारण समोर केल्याने लढतीत प्रत्येकानेच आपली स्वतंत्र यंत्रणा उभी करीत या कार्यकर्त्यांकडून मतदान करवून घेण्याचे काम केले. गावागावांतील गटतटही या निमित्ताने समोरासमोर आल्याने गावपातळीवरची चुरसही महत्त्वपूर्ण ठरली. साहजिकच, काही गावांत ९८ टक्क्यांपर्यंतचे विक्रमी मतदान पोचले. बहुतांश ठिकाणी ७२ टक्क्यांच्या पुढेच मतदान झाल्याचे जिल्ह्यातील नऊही तालुक्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.   

अर्थकारणाचा मुद्दा प्रभावी
अर्थकारणाचा मुद्दाही टक्का वाढवण्यास कारणीभूत ठरला. राजकीय अस्तित्वाच्या व प्रतिष्ठेच्या लढतीत उमेदवारांनी पैशाचा वारेमाप वापर केला. विजयासाठीचे गणित मांडताना व्होट बँकेपेक्षाही ठरावीक आकडा गाठण्यासाठी त्याहीपेक्षा जास्त मतांसाठी पैशाचा वापर केला. यातही प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त पैसा वा टार्गेट ठेवण्यात आल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पदाधिकाऱ्यांसाठीही मुक्त हस्ते लक्ष्मीअस्त्राचा वापर झाल्याने प्रत्येकानेच गावपातळीवर मतदान करवून घेतले.  
 
चारही पक्षांना विभागणीचा धोका !
चारही पक्षांचे उमेदवार असल्याने मतविभागणीचा धोका दोन्ही काँग्रेसप्रमाणेच शिवसेना व भाजपलाही असल्याने मतविभागणी टाळण्यासाठी व्होट बँकेचे मतदान करून घेण्याबरोबरच विजयासाठीच्या मतांसाठीचा कोटा पूर्ण करण्यासाठी अन्य मार्गांचाही वापर झाल्याने मतदानाचा टक्का वाढल्याचा अंदाज राजकीय वर्तुळातूनच व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...