आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांच्या मदतीला धावले झेडपी शिक्षक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - टंचाई निवारणासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यातच उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून दुष्काळ निवारणार्थ स्तुत्य संकल्पना समोर आली आहे. यामध्ये प्रत्येक शिक्षकाने स्वखुशीने एक हजार रुपये याप्रमाणे 50 लाख रुपयांचा निधी उभारून तो ग्रामपातळीवर गरजेनुसार टंचाई निवारणार्थ खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्वरूपाचा राज्यातील हा पहिला प्रयोग ठरणार असून, यासंदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिका-याच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक होऊन निर्णयावर शिक्कामोर्तब झाले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत हजारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. पाटील, शिक्षणाधिकारी आणि सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. या वेळी ग्रामीण भागातील टंचाईसंदर्भात चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात टँकरद्वारे होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा साठा सार्वजनिक ठिकाणी करण्यासाठी सिंटेक्स व जनावरांना हौद उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार रुपये याप्रमाणे 50 लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत. यासाठी टंचाईग्रस्त गावांची यादी संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडून उपलब्ध केली जाणार आहे. टंचाईग्रस्त गावातील लोकसंख्येनुसार सिंटेक्स व जनावरांचे हौद उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेचे एकूण 5 हजार शिक्षक आहेत. या सर्व शिक्षकांकडून प्रत्येकी एक हजार याप्रमाणे 50 लाख रुपये जमा होणार आहेत. यातून सिंटेक्स व जनावरांसाठी पाणीसाठ्याचे हौद खरेदी करण्यात येणार आहेत. शिक्षकांच्या 11 पतसंस्थांच्या वतीने जनावरांना पिण्याचे पाणी साठवण्यासाठी प्रत्येक पतसंस्थेकडून पाच हौद उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
असा असेल उपक्रम
या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक प्रत्येकी एक हजार रुपये मुख्याध्यापकांकडे जमा करतील. त्यानंतर मुख्याध्यापक, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक व शिक्षण विस्तार अधिकारी एकत्रितपणे पाणी नियोजनासंदर्भात स्थानिक गरजेनुसार उपाययोजनेच्या अनुषंगाने निर्णय घेतील. यामध्ये प्रथम प्राधान्य शाळेतील विद्यार्थ्यांना पाणी उपलब्ध करून देणे राहील. टँकर अथवा कूपनलिका असलेल्या गावात पाच हजार लिटरच्या टाक्या उभारणे अथवा जनावरांसाठी हौद उभारून पाण्याची सोय करणे.