आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप-प्रत्यारोपांचा भडिमार; जि.प, पंचायत समिती निवडणूकीचा प्रचार आज रात्री थंडावणार (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. निवडणुकीच्या मैदानात राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रमुख पक्षांनी ग्रामीण भागात प्रचार मोहीम बुलंद केली आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदचे आठ गट व पंचायत समितीच्या सोळा गणांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना,भाजप अशा तीन पक्षांत तिरंगी प्रमुख लढत होत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांचे वारसदार उतरल्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठा अखंडित ठेवण्याची कसोटीदायक ठरणार आहे. जिल्हा परिषदेच्या गंगथडी भागातील वांजरगाव, घायगाव, महालगाव या गटात प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा भडिमार मतदारसंघात सुरू केला आहे. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरीने ग्रामीण भाग ढवळून निघाला आहे. नोटाबंदीचा निर्णयावर काँग्रेस आघाडीने भाजपवर टोकदार निशाणा साधला आहे.   

शिवसेनेकडून खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार आर.एम.वाणी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, अॅड. आसाराम रोठे, आनंदी अन्नदाते या  सेनेची प्रचार मोहिमेची धुरा सांभाळत आहेत. काँग्रेस आघाडीकडून आमदार भाऊसाहेब पा.चिकटगावकर, आमदार सुभाष झांबड,ज्येष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे, डॉ. दिनेश परदेशी ग्रामीण भागात मतदाराच्या गाठीभेटी घेऊन सत्तेसाठी साकडे घालत आहेत.भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव हे तालुक्यात सत्तापरिवर्तन घडवण्याच्या भूमिकेतून पायाला भिंगरी बांधून मतदारसंघात फिरत आहेत. पक्षाची काही मंडळी मात्र निवडक उमेदवारांचा प्रचार करण्यावर भर देत असल्याने भाजपच्या प्रचार मोहिमेत एकसूत्रतेचा अभाव दिसून येत आहे.
  
दरम्यान, लासूरगाव जिल्हा परिषद गटातून सूनबाईंना सेनेच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरविलेल्या माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील हे उघडपणाने प्रचारात उतरलेले नाही. मात्र पैठण तालुक्यात काँग्रेसकडून उभ्या असलेल्या दुसऱ्या सूनबाईंच्या प्रचारात ते सक्रिय आहेत. तेथून ते सोनिया आणि यशवंतरावांच्या काँग्रेसचा निष्ठावंत असल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर करून येथील काँग्रेसच्या पुढाऱ्यांच्या टीकेला चौकसपणाने उतर देत आहे. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार अतुल सावे, माजी आमदार पाशा पटेल यांनी काही गटांत प्रचारसभा घेतल्या, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वैजापूर, शिऊर या ठिकाणी सभा पार पडल्या. पालकमंत्री रामदास कदम, राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पा. चिकटगावकर आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ फिरत आहेत. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी मात्र काही निवडक गटात प्रचार मोहिमेत सहभाग नोंदविल्यामुळे राष्ट्रवादीच्या भुवया उंचावल्या आहेत.प्रचार मोहिमेत सर्वच पक्षांचे नेते सक्रिय झाल्यामुळे जाहीर सभेला गर्दी जमविण्यासाठी दमछाक होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...