मुंबई - दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व्हीआयपी सुविधा नाकारत असतानाच, महाराष्ट्रात मात्र मंत्र्यांच्या बंगले दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केले जात आहेत. वर्षभरात केवळ सात मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीवर 1 कोटी 54 लाख रुपये खर्च झाल्याचे माहिती अधिकारांतर्गत उघड झाले आहे.
आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी आणि अनिल गलगली यांनी वेळोवेळी मागवलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 या कालावधीत हा खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंगल्यावर सर्वाधिक खर्च (37 लाख 98 हजार) करण्यात आला आहे. हा खर्च मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बंगल्यापेक्षा (33 लाख 5 हजार) अधिक आहे. त्याशिवाय गृहमंत्री आर.आर.पाटील (20 लाख 47 हजार), जलसंपदामंत्री सुनिल तटकरे (18 लाख 33 हजार), ग्रामविकासमंत्री जयंत पाटील (16 लाख 18 हजार), अन्न पुरवठामंत्री अनिल देशमुख (16 लाख 3 हजार) आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या बंगल्यावर 12 लाख 18 हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.