आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1 Thousand Crores Rupee For Jalyukt Shivar Yojana

टंचाईमुक्त महाराष्ट्र: जलयुक्त शिवार योजनेसाठी एक हजार कोटींचा निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी राबवण्यात येणा-या जलयुक्त शिवार योजनेसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्यापैकी सहाशे कोटी रुपये जूनपर्यंत उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. या उपक्रमांतर्गत पाच हजार गावे वर्षभरात टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. यातील अडीच हजार गावात कामांची सुरुवात २६ जानेवारी रोजी करावी, त्याचे उद‌्घाटन संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते करावे, अशा सूचनाही फडणवीस यांनी आढावा बैठकीत दिल्या आहेत.

जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरिराज, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव मुकेश खुल्लर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार जलसंपदा विभागाचे सचिव एच टी. मेंढेगिरी आदी या वेळी उपस्थित होते. दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे लक्ष्य गाठण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा, जमिनीतील आर्द्रता टिकून राहावी यासाठी पाणी अडवण्याचे व जिरवण्याचे कार्यक्रम राबवावेत, अशा सूचना मुंडे यांनी दिल्या.

इंजिनिअरिंगचे विद्यार्थी नेमा
- विभागीय आराखडा तयार करून त्यानुसार हे अभियान पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.
- कर्मचारी अपुरे पडल्यास इंजिनिअरिंग अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मानधनावर नियुक्ती करा
- अभियानासाठी जिल्हा नियोजन समितीतील १० टक्के निधी राखून ठेवावा
- कंत्राटदारांना पुढील पाच वर्षे त्या प्रकल्पाच्या देखरेखीचीही जबाबदारी देण्यात यावी
- विदर्भ, मराठवाडा येथील दुष्काळग्रस्त भागात एक लाख विहिरी उभारण्यात याव्यात

दिल्लीतील प्रदर्शनात लक्षवेधी ठरले ‘जलयुक्त शिवार’
दुष्काळावर दीर्घकालीन प्रभावी उपाय म्हणून राबवण्यात येणारी राज्यातील ‘जलयुक्त शिवार योजना’ याशिवाय पाणी वापर संस्थांचे जाळे वाढविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आदींची माहिती देणारे राष्ट्रीय जलसप्ताह प्रदर्शनातील जलसंपदा विभागाचे दालन लक्षवेधी ठरले आहे. केंद्रीय जलस्रोत, नदी विकास आणि गंगा नदी संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ‘चिरंतन विकासासाठी पाणी व्यवस्थापन’ या संकल्पनेवर हे प्रदर्शन दिल्लीत भरले आहे. पाच वर्षांत अडीच लाख शेततळी, पन्नास हजार नालाबांध, वीस हजार सामुदायिक शेततळी, पाच लाख सोलर पंपांची उपलब्धता याच्या नियाेजनाबाबत माहिती दिली जात आहे.