आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभर मतदानाचा टक्का वाढला, राजकीय समीकरणे बदलाची चिन्हे, मुंबईसह 10 महापालिकांसाठी 56%

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रासह सबंध देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील १० महानगरपालिकांसाठी सरासरी ५६.३० टक्के तर ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६९.४३ टक्के मतदान झाले. राज्यभरातील मतदारांनी जास्त उत्साह दाखवल्यामुळे २०१२ मध्ये झालेल्या  निवडणुकीच्या तुलनेत सरासरी १० टक्क्यांनी जास्तीचे मतदान झाले.
 
या वाढीव मतदानामुळे महापालिका आणि जिल्हा परिषदांतील सध्याची राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून अनेकांचे आडाखेही बिघडतील, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.  या  मिनी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी  गुरुवारी होणार असून दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
 
सत्ताधारी शिवसेना व भाजपची मुंबईसह राज्यातील अन्य ९ महापालिका व २६ जिल्हा परिषदांत या वेळी युती होऊ शकली नाही. या दोन्ही मित्रपक्षांत एकमेकांविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडत काट्याची लढत झाली.
 
या निवडणुकीचा प्रचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याभोवतीच फिरत राहिला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात फारसा जोर लावल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही. त्यामुळे सर्वांचे लक्ष शिवसेना आणि भाजपला मिळणाऱ्या मतदारांच्या कौलाकडे लागले आहे.
 
सर्व नजरा मुंबईच्या निकालाकडेच!
गेल्या दोन दशकांपासून मुंबई मनपात शिवसेना-भाजप सत्तेत आहे. शिवसेनेचा ‘छोटा भाऊ’ म्हणून वावरणाऱ्या भाजपने  २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर यंदाच्या शिवसेनेने देऊ केलेल्या जागा घेण्यास नकार दिल्याने युती तुटली. त्यामुळे ३७००० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाच्या मुंबई मनपावर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
दुसऱ्या टप्प्यात १७३३१ उमेदवार
निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात १० मनपांच्या १,२६८ जागांसाठी ९,२०८ उमेदवार तर ११ जिल्हा परिषदांच्या ६५४ जागांसाठी २,९५६ उमेवार आणि ११८ पंचायत समित्यांच्या १,२८८ जागांसाठी ५,१६७ उमेदवार रिंगणात आहेत.
 
पहिल्या टप्प्यातही झाले ६९ टक्केच
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान घेण्यात आले. या टप्प्यातही ६९ टक्के  मतदान झाले होते.
 
आमिरच्या पारदर्शक जाहिरातीवर आक्षेप
मुंबईत  आमिर खानने केलेल्या ‘मुंबई फर्स्ट’ या  एनजीओच्या जाहिरातीत भाजपच्या प्रचारातील ‘पारदर्शकता’ शब्द  ठळक छापला. त्याविरुद्ध शिवसेना व काँग्रेसने आचारसंहिता भंगाची तक्रार केली.
 
मतदानादरम्यान दोघांचा मृत्यू : मतदान प्रक्रियेदरम्यान दोघांचा मृत्यू झाला. सोलापुरात मतदानाच्या रांगेत उभे असलेले ज्येष्ठ नागरिक गंगाधर शेटे (वय ७५, उत्तर कसबा) यांचा चक्कर येऊन पडल्यामुळे मृत्यू झाला.  रत्नागिरी जिल्ह्यातील सुकीवली येथील मतदान केंद्रावरही महादेव चाळके यांचा मृत्यू झाला.

या 10 महापालिकांसाठी मतदान 
#1 मुंबई, #2 ठाणे, #3 उल्हासनगर, #4 नाशिक, #5 पुणे, #6 पिंपरी-चिचवड, #7 सोलापूर, #8 अकोला, #9 अमरावती, #10 नागपूर

11 जिल्हा परिषदांसाठी मतदान 
#1 रायगड, #2 रत्नागिरी, #3 सिंधुदुर्ग, #4 सातारा, #5 सांगली, #6 कोल्हापूर, #7 पुणे, #8 सोलापूर, #9 नाशिक, #10 अमरावती व #11 गडचिरोली

येथे चुरशिची लढत 
- मुंबई महापालिका 25 वर्षांपासून शिवसेना - भाजप युतीच्या ताब्यात आहे. यंदा प्रथमच हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत आहे. 
- भाजप आणि शिवसेना राज्यात आणि केंद्रात सत्तेत आहे, मात्र त्यांनी महापालिका निवडणुकीत युती केली नाही. 
- मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प साधारण 40 हजार कोटी रुपयांचा असतो. त्यावर सर्वांचा डोळा असल्याचे या निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपातून समोर आले. 
- नाशिक महापालिकेची निवडणूक मनसे नेते राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.    
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, 10 महापालिकेत किती उमेदवार रिंगणात,
> 2012 मध्ये कोणता पक्ष सर्वात मोठा 
> कोणी-कोणी केले मतदान
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...