आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना 10 हजारांची तातडीची कर्जरूपी मदत, निकष 24 जूनपर्यंत ठरवण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू असतानाच खरिपाच्या पेरण्या सुरू झाल्यामुळे थकबाकीदार शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीसाठी तातडीची  १० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र ही रक्कम कर्जरूपानेच दिली जाईल. सरकार ती हमी घेईल. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज मंजूर झाल्यावर ही रक्कम कापून घेतली जाईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कर्जमाफीबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचेही पाटील म्हणाले.
 
कर्जमाफीस एकराची मर्यादा नसल्याचे सांगून खासदार शरद पवार यांच्या कृषी क्षेत्रातील दांडग्या अनुभवाचा निकष ठरवण्यासाठी फायदा होईल, असे ते म्हणाले.
सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. परंतु कर्जमाफीची सविस्तर नियमावली तयार न झाल्याने कर्जमाफीचा अजूनही जीआर निघालेला नाही. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्यानंतर थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपयांची त्वरित मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
राज्यात सुमारे ३० लाख शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांना पेरणीसाठी बी-बियाणे, खते घेण्यासाठी पैशांची गरज आहे. कर्जमाफीचा जीअार निघेपर्यंत त्यांना बँका पुन्हा कर्ज देणार नाहीत. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन या शेतकऱ्यांना त्वरित दहा हजार रुपये मदत कर्जरुपानेच दिली जाणार आहे. जे शेतकरी या दहा हजार रुपयांसाठी अर्ज करतील त्यांनाच बँका ही मदत देतील आणि राज्य सरकार त्याची हमी देईल. कर्ज मंजूर झाल्यानंतर ही दहा हजार रुपयांची रक्कम त्या कर्जातून कापून घेतली जाईल, असे पाटील म्हणाले. शिवसेना अजूनही कर्जमाफीवर नाराज असल्याचे सांगताच चंद्रकांत पाटील म्हणाले, मी आज उद्धव ठाकरे यांना भेटणार होतो परंतु आदित्य ठाकरे यांचा वाढदिवसामुळे भेट होणार नसल्याने मी बुधवारी त्यांची वेळ घेऊन कर्जमाफीबाबत सविस्तर माहिती देऊन त्यांचे शंका निरसन करणार आहे. शिवसेना हा स्वतंत्र पक्ष असून त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाटलांचे तर्कट : शेतकरी कर्ज घेतात अन् बँकेत एफडी करतात
महसूलमंत्री म्हणाले, अनेक शेतकरी शून्य टक्क्याने मिळते म्हणून पीक कर्ज घेतात. त्याची ११ महिन्यांसाठी बँकेत एफडी केल्यावर साडेसहा हजार रुपये नफा मिळतो. अशांना कर्जमाफीतून वगळण्यात येईल. ज्या घरात सरकारी नोकर आहे, कुटुंबातील व्यक्ती आयकर भरते, घरी कार आहे, अशांना कर्जमाफी द्यायची की नाही, याचा विचार हाेईल.

सधन शेतकरी नाकारत आहेत स्वेच्छेने कर्जमाफी
सधन शेतकरी कर्जमाफी नाकारत आहेत. अंमळनेरचे साहेबराव पाटील  व अा. राहुल कुल यांनी तसे पत्र दिले. असे १०० वर  एसएमएस आले आहेत. नाना पाटेकरांनीही सधन शेतकऱ्यांना हेच आवाहन केले आहे. अन्य सेलिब्रिटीजनाही तसे आवाहन करावे, अशी विनंती नानांना करणार असल्याचे पाटील म्हणाले.

निकष २४ जूनपर्यंत ठरवण्याचा आमचा प्रयत्न
कर्जमाफीचा जीआर कधी निघणार असे, विचारता चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकरी नेते व मंत्र्यांची एक समिती नेमणार आहोत. ही समिती निकष तयार करेल. २४ जुलैपर्यंत समिती आपले निकष सादर करील. परंतु २४ जुलैऐवजी २४ जूनपर्यंतच निकष तयार व्हावेत असा सरकारचा प्रयत्न आहे.

हेही वाचा...
आता तिसरी सुकाणू समिती; राजकीय मंडळींनी 'शेतकरी आंदोलन' हायजॅक केल्‍याचा आरोप
कर्जमाफीचा शासनादेश नाही, मात्र बँकांना नवे कर्ज देण्याचे आदेश; शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था
बातम्या आणखी आहेत...