आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - वाढती लोकसंख्या आणि रुग्णांना इस्पितळापर्यंत पोहोचण्यात होणारा अंतराचा त्रास लक्षात घेऊन राज्यातील जिल्हा रुग्णालयांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी तयार करण्यात आलेला आरोग्य बृहत आराखडा मंजूर करण्यात आला असून औरंगाबाद, नाशिक, धुळे, सोलापूर आदी दहा शहरांत 100 खाटांचे जिल्हा रुग्णालय या आराखड्यानुसार बांधण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे चालविण्यात येणा-या रूग्णालयांवर सध्या मोठ्या प्रमाणावर ताण वाढल्याने ग्रामीण व शहरी भागातील रूग्णांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याचे समोर आले आहे. याबाबत गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने राज्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्याचे नियोजन केले होते.
120 नवे पीएचसी
राज्यातील आरोग्य विभागातर्फे सर्वच स्तरावरील नागरिकांपर्यंत आरोग्यसुविधा पोहोचवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. यासाठी आगामी पाच वर्षात कोणत्या-कोणत्या उपाययोजना कराव्यात यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला. राज्यात सध्या 252 प्राथमिक आरोग्य केंद्रे कार्यरत असून त्यात आणखी 120 प्राथमिक आरोग्य केंद्रांची भर पडणार आहे. तसेच कोल्हापूर, लातूर, अकोला, यवतमाळ, औरंगाबाद, नांदेड, नागपूर, सांगली, धुळे, सोलापूर येथे 100 खाटांची जिल्हा रूग्णालये स्थापन करण्यासही मंजूरी देण्यात आली आहे. या नव्या रूग्णालयांमुळे ग्रामीण भागातील रूग्णांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा मिळतील, अशी सरकाला आशा आहे.
बारामती, परभणीतही खाटा वाढणार
बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करून 100 खाटांचे हे रुग्णालय 300 खाटांचे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच बारामती स्त्री रुग्णालयाची श्रेणी वाढवून तेथील खाटांची संख्या 100 वरून 200 करण्यात येणार आहे. परभणी येथील स्त्री रुग्णालयाच्या खाटांची संख्याही 60 वरून 100 करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.
47 नवी ग्रामीण रुग्णालये
भिवंडी, पंढरपूर, शेगाव येथील 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांचे 200 खाटांच्या सामान्य रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली असून 30 खाटांची नवीन 47 ग्रामीण रुग्णालयेही स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गणपती पुळे, खालापूर, वडखळ नाका, तळा येथे ही ग्रामीण रुग्णालये स्थापन करण्यात येणार असून 147 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. महामार्गावरील अपघातात जखमी होणा-यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याबाबतही या आराखड्यात गंभीरपणे विचार करण्यात आला आहे. वडखळ नाका, पनवेल, मुरबाड, इगतपुरी, राजापूर, कणकवली, सावंतवाडीसह राज्यात 42 ट्रॉमाकेअर युनिट स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.