आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 100 Cr Help From New York Ex Mayor For Mumbai Traffic

विधायक : वाहतूक समस्येसाठी न्यूयॉर्कचे माजी महापौर ब्लूमबर्ग देणार १०० कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईमध्ये रोज नव्या गाड्या रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला ट्रॅफिकच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी जगातील श्रीमंतांच्या यादीत १३ व्या स्थानावर असलेले न्यूयॉर्कचे माजी महापौर आणि उद्योग जगतात ख्यातनाम ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेचे मालक मायकल ब्लूमबर्ग पुढे सरसावले आहेत.
देशातील अनेक महानगरांसोबत झालेल्या स्पर्धेतून मुंबई या देशातील या एकमेव महानगराची शांघाय, साओ पावलो अशा महानगरांसह यासाठी निवड झाली आहे. १७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत. ब्लूमबर्ग या योजनेसाठी १०० कोटी रुपये खर्च करणार आहेत. त्यापूर्वी ब्लूमबर्ग १६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.
मायकल ब्लूमबर्ग यांनी न्यूयॉर्कचे महापौर झाल्यानंतर नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक योजना आखल्या आणि त्या यशस्वीही करून दाखवल्या. यामध्ये २१ वर्षांवरील तरुणांनाच सिगारेट विक्री करण्याची अट, शहरातील ट्रॅफिकची समस्या आदींचा समावेश आहे. याच ब्लूमबर्ग यांनी जगभरातील दहा शहरांना ट्रॅफिकमुक्त करण्याचा संकल्प आपल्या ब्लूमबर्ग फाउंडेशन या एनजीओद्वारे सप्टेंबरमध्ये सोडला होता. भारतातील अनेक महानगरांनी आपली निवड यासाठी व्हावी म्हणून प्रयत्नही केला होता.
अशी असेल पूर्वतयारी

ब्लूमबर्ग हे या योजनेसाठी एकूण ९०० कोटी रुपये खर्च करणार असून त्यापैकी १०० कोटी मुंबईच्या वाट्याला येणार आहेत. मुंबई महानगरपालिकेने पाठवलेला अर्ज मंजूर झाल्यानेच मुंबईची निवड करण्यात आली आहे. जगभरातील शांघाय, साओ पावलो आदी शहरांचीही निवड करण्यात आली आहे. यासाठी परदेशातील तज्ज्ञ लवकरच मुंबईत येणार आहेत.

न्यूयॉर्कची समस्या सोडवली

न्यूयॉर्कमधील ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी ब्लूमबर्ग यांनी अनेक नियम केले आहेत. यामध्ये सकाळी कामाच्या वेळेस शहरात येणाऱ्या गाड्यांना ५०० पौंड प्रवेश फी आकारली. त्यामुळे गाड्यांची संख्या कमी झाली. तसेच नवीन गाडी घेण्यापूर्वी गाडी घेणाऱ्याने त्याच्याकडे पार्किंगची व्यवस्था असल्याचे पत्र देणे बंधनकारक करण्यात आले.
केल्याने नवीन गाड्या घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. टॅक्सीचे भाडे अवाच्या सव्वा केल्याने टॅक्सीचा वापर कमी झाला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल केल्याने श्रीमंत व्यक्तीही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू लागले.
मुंबईत किलोमीटरमागे ७२५ वाहने

मुंबईतील वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या अपुऱ्या रस्त्यांची संख्या आणि येथील जागेच्या अडचणी पाहता वाहनांची संख्या प्रचंड आहे. मुंबईत सध्या नोंदणी झालेली २३ लाखांहून अधिक वाहने आहेत. या वाहनांची घनता प्रत्येक किलोमीटरमागे ७२५ वाहने अशी आहे. यापैकी ७ लाख वाहने ही खासगी असून यात ९४ हजार दुचाकींचा समावेश आहे.

उर्वरित वाहने ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहने किंवा सरकारी वाहने आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनांमध्ये ४८ हजार ८७१ टॅक्सींचा, १ लाख १८ हजार ऑटोरिक्षांचा, तर मुंबई महापालिकेच्या बेस्टच्या ४२ हजार बसगाड्यांचा समावेश होतो. याशिवाय मुंबईत बाहेरून येणारी चारचाकी वा बहुचाकी वाहने यांची संख्याही खूप मोठी आहे. गेल्या ६० वर्षांत मुंबईत वाहनांची संख्या ५५ टक्क्यांनी वाढली आहे.

ब्लूमबर्ग कोण?
अमेरिकेतील १० व्या क्रमांकाची आणि जगातील १३ व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती. न्यूयॉर्क या अमेरिकेच्या आर्थिक राजधानीचे २००१ ते २०१३ असे सलग तीन वेळा महापौर म्हणून ते निवडून आले. अमेरिकेचे संभाव्य अध्यक्ष म्हणूनही त्यांच्या नावाची सतत चर्चा होत असते.