Home »Marathi Katta» 10,700 Shows And Counting: Prashant Damle

‘रंगभूमीवरील विक्रमादित्य’- प्रशांत दामले

प्रतिनिधी | Jan 07, 2013, 09:56 AM IST

  • ‘रंगभूमीवरील विक्रमादित्य’- प्रशांत दामले

मुंबई- ‘प्रशांत दामले हे अभिनयाची चालतीबोलती कार्यशाळा आहेत,’ असे कौतुक करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दामले यांचा ‘रंगभूमीवरील आजचा विक्रमादित्य’ असा उल्लेख केला.


‘टूरटूर’ या नाटकातील बंगाली माणसाच्या भूमिकेद्वारे 1983 मध्ये रंगमंचावर पदार्पण केलेल्या प्रशांत दामले या अभिनेत्याने गेली 29 वर्षे सातत्याने ‘प्रयोग’शील राहून रंगभूमीवर विविध 25 नाटकांचा ‘प्रशांत’ महासागर निर्माण केला. त्या महासागराची नोंद घेत रंगभूमीवर 10 हजार 700 प्रयोग करणा-या दामलेंचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. दामले यांनी शनिवारी ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचा प्रयोग सादर करुन 10 हजार 700 व्या प्रयोगावर शिक्कामोर्तब केले. दामले अध्यक्ष असलेल्या निर्माता संघातर्फे त्यांना ‘तंबोरा’ देऊन गायन आणि रियाज यावर भर द्यावा, असे सूचित करण्यात आले. या वेळी ‘प्रशांत महासागर’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या विशेषांकात तब्बल 70 जणांनी प्रशांतविषयी आपल्या भावना मांडल्या असून दामले यांचा आंतरमहाविद्यालयीन स्पर्धां ते आजपर्यंतच्या नाट्यप्रवासाचा आढावा त्यात घेण्यात आला आहे.


गृहमंत्री आर. आर. पाटील, सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनीही प्रशांत दामले यांचे कौतुक केले. दामले यांच्या नावाची शिफारस पद्म पुरस्कारासाठी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. प्रेक्षकांच्या आणि सहकलाकारांच्या प्रेमाने भारलेल्या प्रशांत दामले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी ‘महाराष्ट्राची लोकधारा’च्या निमित्ताने झालेली भेट, विलासराव देशमुख यांच्याकडून स्वीकारलेले पहिले बक्षीस, गेला माधव कुणीकडे या नाटकाचे निर्माते मोहन तोंडवळकर आणि ‘श्री तशी सौ’मध्ये घट्ट मैत्री जमलेल्या अक्षय पेंडसे यांची प्रकर्षाने आठवण काढली. दामलेंना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर कलाकार कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

‘गिनीज’वाल्यांची दांडी
10 हजार 288 प्रयोग करून एका जपानी कलाकाराने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले होते. शनिवारी 10 हजार 700 वा नाट्यप्रयोग करून प्रशांत दामले यांनी विश्वविक्रम केला. मात्र त्याची नोंद घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या कार्यक्रमास हजर नव्हते. मात्र या कार्यक्रमाचे शूटिंग त्यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती ‘प्रशांत दामले 10700 स्वागत समिती’तर्फे देण्यात आली.

चार लिम्का रेकॉर्ड्स
* 24 डिसेंबर 1995 - 3 वेगवेगळे प्रयोग एकाच दिवशी सादर
* 1 जानेवारी 1995 ते 31 डिसेंबर 1995 -- 365 दिवस 242 प्रयोग
* 1 जानेवारी 1996 ते 31 डिसेंबर 1996 - 365 दिवस 469 प्रयोग
* 18 जानेवारी 2001 - 5 प्रयोग 3 वेगवेगळी नाटके एका दिवसात

‘प्रशांत नाट्य महासागर’
टूरटूर, महाराष्‍ट्राची लोकधारा, मोरूची मावशी, ब्रह्मचारी, लग्नाची बेडी, प्रीतिसंगम, पाहुणा, चल.. काहीतरीच काय, सुंदर मी होणार, लेकुरे उदंड झाली, प्रियतमा, बे दुणे पाच, चार दिवस प्रेमाचे, शू.. कुठे बोलायचे नाही, लग्नाची गोष्ट, आम्ही दोघे राजा राणी, व्यक्ती आणि वल्ली, जादू तेरी नजर, ओळख ना पाळख, बहुरूपी, श्री तशी सौ, गेला माधव कुणीकडे, सासू माझी ढासू, माझिया भाऊजींना रीत कळेना या 25 नाटकांचे महाराष्ट्रभर सादर केले.

Next Article

Recommended