मुंबई - २०१५ च्या सुरुवातीच्या पाच महिन्यांत विविध प्रकरणांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या राज्याच्या १७ कारागृहांमधील १५९५ कैद्यांना संचित (फर्लो) आणि अभिवचन (पॅरोल) रजा मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र, यापैकी जवळजवळ ८० कैदी फरार झाले होते, त्यापैकी काही जण स्वतःहून हजर झाले, तर काही जणांना पोलिसांनी पकडले असून अजूनही ११ कैदी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे गृह विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.
गृह विभागातील अधिकाऱ्याने या अहवालाबाबत माहिती देताना सांगितले, कैद्यांच्या रजांबाबतचा तपशील गृह विभागाने कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांच्याकडून काही महिन्यांपूर्वी मागवला होता. अहवालातील आकडेवारीनुसार, जानेवारी ते मे २०१५ दरम्यान औरंगाबाद, नाशिक रोड, अमरावती, पैठण, येरवडा, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणच्या फर्लो रजेवर ८५९, तर पॅरोलवर ७३६ कैद्यांना रजा मंजूर करण्यात आली. या कैद्यांपैकी संचित रजेवर गेलेले २६, तर अभिवचन रजेवर गेलेले ५४ असे ८० कैदी फरार झाले होते. फरार झालेल्या कैद्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू करण्यात आला. फरार झालेले ३८ कैदी स्वत:हून पोलिसांकडे आले, तर ३१ जणांना पोलिसांनी पकडले. मात्र, अजूनही ११ कैदी फरार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पॅरोल आणि फर्लो रजेचा अर्थ
शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोल आणि फर्लो अशा दोन प्रकारच्या रजेवर सोडले जाते. फर्लो रजा प्रत्येक कैद्याचा अधिकार असतो. शिक्षेचा विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यानंतर त्याची वर्तणूक आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागवून कैद्यांना ही रजा दिली जाते. पॅरोल रजा ही कैद्याचे नातेवाईक आजारी असल्यास विभागीय आयुक्तांकडून मंजूर केली जाते. पॅरोल देण्यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल असलेल्या पोलिस ठाण्याचा अहवाल, कारागृहातील त्याचा वर्तणूक अहवाल, त्याचे नातेवाईक आजारी असेल तर त्याचा अहवाल हा संबंधित विभागीय आयुक्तांकडे पाठवला जातो. ते पाहून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्याला सात ते ३० दिवसांपर्यत संचित रजा मंजूर केली जाते.