मुंबई/पुणे- पुणे महापालिकेत ११ गावांचा समावेश होणार आहे. उर्वरित २३ गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात दिले. उरळी आणि फुरसुंगी या गावांचा पुर्णपणे तर नऊ गावांचा अंशतः समावेश केला जाईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. मात्र अंशतः म्हणजे काय याबाबत कोणतेही स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलेले नाही.
पुण्याभोवतालच्या 34 गावांचा महापालिकेत समावेश करण्यात यावा, यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर म्हणणे मांडताना राज्य सरकारने केवळ दोन गावांचा पुर्णपणे समावेश करण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे.
उरलेल्या 23 गावांचा समावेश पाण्याची उपलब्धता, रिंग रोड आणि इतर सुविधांचा विचार करुन पुढील तीन वर्षांमध्ये घेतला जाईल असे राज्य सरकारनी म्हटले आहे. म्हणजे पुण्याभोवतालच्या 23 गावांना महापालिकेत येण्यासाठी आणखी तीन वर्षे वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.