आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1100 Crore Rupee Not Use For Construction Workers

बांधकाम कामगारांसाठी वसूल केलेले 1100 कोटी रक्कम विनियोगाशिवाय पडून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बांधकाम कामगारांसाठी वसूल केल्या जाणा-या सेसची 1,100 कोटींची रक्कम संबंधित मंडळाकडे विनियोगाशिवाय पडून आहे. कामगार कुटुंबीयांसाठी त्याचा वापरच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सरकारकडे सेस वसुली व देखरेख करण्यासाठी अपु-या मनुष्यबळामुळे कमी रक्कम जमा झाली आहे. प्रत्यक्षात ही रक्कम 10 हजार कोटी रुपये हवी होती, अशी माहिती कामगार विभागातील सूत्रांनी दिली.


कामगार कायद्यानुसार, 10 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या बांधकामातून 1 ते 2 % सेस विकासकाकडून गोळा केला जातो. या सेसमधून कामगारांना आजारपणात, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे दिले जातात. सरकारच्या कामगार मंडळाकडे गेल्या तीन-चार वर्षांत 1100 कोटी सेस जमा झाला असून त्याचा विनियोग झालेला नाही. राज्यातील दोन लाख बांधकाम कामगारांना त्याचा फायदा घेता आला नाही. वेळेवर सेस न भरणा-यांवर दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे धोकादायक परिस्थिती काम करणा-या कामगारांपर्यंत पैसा पोहोचलाच नाही.


कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार म्हणाले, 1100 कोटी रुपये सेस शिल्लक असून या पैशांमधून कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रस्ताव कामगार आयुक्तांकडे पाठवला आहे. बांधकाम कामगारांची साधारण सहा लाख मुले असून त्यांना शाळेत जाण्यासाठी दिले जाणारा भत्ता 50 रुपये प्रति महिना वाढवून 300 ते 500 रुपये करण्याचे प्रस्तावित आहे.


इंग्रजी व संगणक शिक्षणाची तरतूद
अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी कामगारांच्या पाल्यांना 35 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ती तुटपुंजी असून एक लाख रुपये द्यावी, असेही त्या प्रस्तावात सांगितल्याचे कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी सांगितले. मुलांची फी या सेसच्या पैशातून भरली गेली तरी त्यांचे शिक्षण सुरू राहील व भविष्यात त्यांना नोकरी-व्यवसायाच्या इतर संधी उपलब्ध होतील, असेही अरविंद कुमार यांनी सांगितले.