आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना दिलासा: पावसाची ओेढ: कृषिपंपांना महिने 12 तास वीजपुरवठा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या २५ दिवसांपासून राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके करपण्याचा निर्माण झालेला धोका लक्षात घेता जलयुक्त शिवारच्या पाण्यावर पिके तगवण्यासाठी कृषिपंपांना पुढील तीन महिने १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सांगितले.

गेल्या २५ दिवसांपासून विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी कासावीस झाला आहे. वाढीस लागलेल्या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी तातडीची बैठक घेतली. बैठकीत पीकपाण्याचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांनी आवश्यक तेथे कृषि पंपांना दिवसाही वीज मिळावी म्हणून १२ तास वीज देण्याचे निर्देश दिले. नोव्हेंबरपर्यंत १२ तास वीज देण्यास सांगितले. १२ तास वीज देण्याबाबत एमईआरसीला लवकरच सांगितले जाईल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

राज्य सरकारने सौरउर्जा निर्मितीवर भर देण्याचे ठरवले असून ७५०० मेगावॅट वीजनिर्मितीची योजना आखली आहे. यासाठी खासगी गुंतवणूकदारांची मदत घेतली जाणार आहे. सौरऊर्जेचे प्रकल्प सुरू झाल्यानंतर उद्योगांना दिल्या जाणाऱ्या विजेचे दर कमी होतील, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

तिजोरीवर पडणार सुमारे ६०० कोटींचा बोजा
शेतकऱ्यांना १२ तास वीज दिल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ५५० ते ६०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मात्र पिके हातची जाऊन चार हजार कोटी रुपये देण्यापेक्षा ६०० कोटींचा भार जास्त नाही. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

वीजचोरी पकडण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस ठाणे : वीजचोरीरोखण्यासाठी सध्या राज्यात फक्त पोलिस ठाणी आहेत. शेतकऱ्यांकडे सुमारे १३ हजार कोटी विजेची थकबाकी आहे. वीजचोरी रोखण्यासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात दोन किंवा तीन पोलीस ठाणी प्राधिकृत करून वीजचोरीची तक्रार नोंदवून घेतली जाईल. वीजचोरी पकडण्यासाठी भरारी पथकासोबतच स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.

मागणी करतील त्याच शेतकऱ्यांना वीज दिली जाईल. संपूर्ण राज्याला १२ तास विजेची गरज नाही. आवश्यक त्या भागात पूर्ण तीन महिनेही १२ तास वीज लागणार नाही. पूर्ण राज्याला १२ तास वीज द्यायची तर तिजोरीवर एक हजार कोटींचा भार पडला असता असे बावनकुळे म्हणाले.

मागणी करतील त्याच शेतकऱ्यांना वीज
पाणी आहे पण...

जलयुक्त शिवार योजनेमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साठले आहे. मात्र वेळेवर वीज मिळाली नाही तर हे पाणीही वापरले जाऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसाही कृषि पंपांसाठी वीज देण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने १२ तास वीजपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे.
बातम्या आणखी आहेत...