आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीतही \'INCOMING\'; 9 अपक्षांसह 12 आमदारांचा प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजप-शिवसेनेला चांगले दिवस येणार या केवळ शक्यतेनेच राष्ट्रवादीतील अडगळीतील अनेक नेते महायुतीत गेल्याने पक्षाला खिंडार पडले होते. मात्र, अनेक छोटे-मोठे नेते पक्षातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीत आज विद्यमान 12 आमदारांसह सुमारे 15 बड्या नेत्यांनी प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत या आमदारांनी प्रवेश केला. यातील तीन-चार आमदार उपस्थित नव्हते मात्र फोनवरून पक्षात प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले आहे. यातील अनेक आमदारांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती.
दरम्यान, यातील बहुतेक अपक्ष आमदार हे मूळचे राष्ट्रवादीचेच होते. 2009 साली आघाडीत काँग्रेसला जागा सुटल्यानंतर त्यांनी बंडखोरी करीत विजयश्री खेचून आणली होती. आता या सर्वांना अधिकृत प्रवेश दिला गेला आहे तसेच तिकीटही दिले जाणार आहे. आघाडीच्या नियमानुसार जो विद्यमान आमदार ज्या पक्षात असेल त्याला ती जागा सोडावी असे ठरले आहे. त्याच न्यायाने या सर्व जागी काँग्रेसला राष्ट्रवादीला जागा सोडाव्या लागणार आहेत.
मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पराभव होईल असे गृहित धरले जात असतानाही या अपक्ष आमदारांनी पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवड शहरातील अपक्ष आमदार विलास लांडे व लक्ष्मण जगताप यांच्यासह रवि राणा अनुपस्थित होते.
या 12 विद्यमान आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
1) दिलीप सोपल (मतदारसंघ- बार्शी, सोलापूर),
2) विलास लांडे (मतदारसंघ- भोसरी, पुणे)
3) लक्ष्मण जगताप (मतदारसंघ - चिंचवड, पुणे)
4) मकरंद जाधव (मतदारसंघ- वाई, सातारा)
5) रमेश थोरात (मतदारसंघ- दौंड, पुणे)
6) रवी राणा (मतदारसंघ- बडनेरा, अमरावती)
7) बाळासाहेब पाटील (मतदारसंघ - उत्तर कराड, सातारा)
8) साहेबराव पाटील (मतदारसंघ - अंमळनेर, जळगाव)
9) शरद गावित (सपाचे आमदार) ( मतदारसंघ नवापूर, नंदूरबार)
10) मानसिंग नाईक ( शिराळा, सांगली)
11) सुरेश देशमुख (वर्धा)
12) बाबासाहेब पाटील ( अहमदपूर, लातूर)
याचबरोबर माजी आमदार व नारायण राणेंचे कट्टर समर्थक राजन तेली, काका कुडाळकर यांच्या मनोज नाईक या तीन नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले आमदार दीपक केसरकर यांच्याविरोधात सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली यांना राष्ट्रवादी तिकीट देणार आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी रिडालोसच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली होती. शरद गावित हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आमदार झाले होते. रवी राणा यांनी राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांचा पराभव करीत निवडणूक जिंकली होती. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकाप-मनसेचा पाठिंबा घेत लोकसभा लढविली होती. मात्र त्याचा दीड लाख मतांनी दारूण पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत आल्यावाचून पर्याय नव्हता.