मुंबई - नांदेडमधील सर्वपक्षीय १३ नगरसेवकांसह मराठवाड्यातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी भाजप पक्षात प्रवेश केला. नांदेड उत्तर जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, भूमच्या नगराध्यक्षा सुप्रिया वारेंसह १७ नगरसेवक अाणि २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांनीही ‘कमळ’ हाती घेतले.
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक गुरुवारी हाेत अाहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, ‘या बैठकीत संघटनात्मक ठराव होतील. राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार नसून नेहमीसारखी कार्यकारिणीची बैठक असेल.’ अन्य पक्षांमधील अनेक ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत का? या प्रश्नावर दानवे म्हणाले, ‘आमच्या पक्षात कोणाला प्रवेश करायचा असल्यास कोणतीही अडचण येणार नाही.’ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा भाजपमध्ये नक्की कधी प्रवेश होईल का, या प्रश्नाचे मात्र त्यांनी उत्तर दिले नाही.
प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ फेरबदल, प्रदेशाध्यक्ष बदल होणार असल्याच्या चर्चांना वेग आला अाहे. मंत्री प्रकाश मेहता, विष्णू सावरा यांना वगळण्यात येणार असल्याचे बोलले जाते. मेहतांना वगळण्यासाठी दबाव असला तरी त्यांना दूर करण्याची हिंमत फडणवीस दाखवतील की नाही, याविषयी शंका आहे. दरम्यान, आणखी काही जण इतर पक्षातून भाजपात येतील, असे नेत्यांना वाटत आहे.