आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील १४% बालके श्वसनविकारांनी त्रस्त, अाराेग्यमंत्री डाॅ. सावंत यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई-पुण्यातील बालकांमध्ये श्वसनविकारांचे प्रमाण वाढले असून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात आणि वाढत्या आरोग्याच्या तक्रारींच्या निवारणार्थ पर्यावरण आणि आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती नेमणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली.
प्रदूषित हवेमुळे मुंबईतील आणि राज्यातील मुलांचे आरोग्य बिघडत असल्याबाबत काँग्रेसच्या अनंत गाडगीळ, संजय दत्त, भाई जगताप आणि राहुल नार्वेकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत २०१४-१५ मध्ये राज्यातील आरोग्य पाहणीत ५ ते ११ वयोगटातील १ कोटी २२ लाख ३६ हजार १२८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती.

त्या तपासणीत १ लाख १५ हजार ५३ विद्यार्थी श्वसनसंस्थेच्या विकाराने आजारी असल्याचे आढळून आले आहे. यापैकी १ लाख १४ हजार ७१३ विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले तर ३४० विद्यार्थ्यांना योग्य उपचारासाठी वरिष्ठ रुग्णालयात पाठवल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. ब्रेथ ब्ल्यू सर्व्हेनुसार, मुंबईतील १३ टक्के विद्यार्थ्यांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी असून १४ टक्के विद्यार्थ्यांच्या फुप्फुसाची कार्यक्षमता अत्यंत कमी असल्याचे आढळून आल्याचे डाॅ. दीपक सावंत यांनी सांगितले.

मुंबईतील माझगाव येथील कोळसा डेपोमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार उद्भवले अाहेत. त्यामुळे कोळसा डेपोचे अन्यत्र स्थलांतर करावे, अशी मागणी राष्ट्रवादीच्या राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर डाॅ. दीपक सावंत यांनी बदलती जीवनशैली, वाढती बांधकामे आणि प्रदूषण यामुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे मान्य करत शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसंदर्भात समिती नेमणार असल्याची घोषणा केली.
बातम्या आणखी आहेत...