आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात 15 टक्के गुन्हेगारांना शिक्षा; पंच फितुरी, सरकारी वकीलांची वानवा कारणीभूत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यात नोंद झालेल्या खटल्यापैकी केवळ 15 टक्के गुन्हेगारांना शिक्षा होते. परंतु, यात पोलिस खाते जबाबदार नसून पंच फितुरी आणि सरकारी वकीलांची वानवा कारणीभूत आहे, अशी कबुली राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी दिली.

सोमवारी राज्य पोलिस मुख्यालयात ‘महाराष्ट्र गुन्हे 2012’ अहवालाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात 2011 मध्ये गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण अवघे 8. 2 टक्के होते. पोलिस खात्याच्या विविध प्रयत्नामुळे हे प्रमाण वाढत आहे. यंदा हे प्रमाण 15.1 टक्के झाले आहे. राज्यातील 66 टक्के खटल्यात पंच फितुर होतात. त्यामुळे शिक्षादर घसरत असून तज्ज्ञ सरकारी वकिलांची वानवा आमच्यापुढील सर्वाधिक चिंतेची बाब बनली आहे, असे दयाळ म्हणाले. कायदा सुव्यवस्था योग्य नसेल तर गुंतवणूकदार पाठ फिरवतात. आज खासगी क्षेत्रात अधिक नोकर्‍या आहेत. त्यामुळे राज्याची नकारात्मक प्रसिद्धी होऊ नये, यासाठी पोलिसांनी जबाबदारीचे भान ठेवावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. राज्यात नागरीकरण वेगात होत आहे. त्यामुळे साहजिकच गुन्हय़ांचा आलेख वाढत आहे. गुन्हय़ांची वाढती संख्या पुढे येऊ नये म्हणून गुन्हय़ांची नोंद थांबवू नका, अशी तंबी आर. आर. पाटील यांनी या वेळी दिली.


राज्यात गुन्हेगारांचा डेटा (सीसीटीएनएस) तयार करण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल. त्यानंतर मात्र गुन्हेगार शोधणे सहज शक्य होईल, अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केली.
राज्यात 2 हजार 712 खून, 793 दरोडा, 6 हजार 949 जबरी चोरी, 15 हजार 648 घरफोडी, 74 हजार 476 चोरी, 60 स्फोटविषयक, 1 हजार 399 अँट्रॉसिटी गुन्हे नोंद झाल्याची माहिती या अहवालात नमूद केली आहे.