आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थकित पगारासाठी शिक्षकांची निदर्शने, दर्डांनी आश्वासन न पाळल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अतिरिक्त तुकड्या असल्याचे दाखवून लातूर जिल्ह्यातील 235 शिक्षकांचे वेतन गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून अचानक थांबविण्यात आले आहे. त्यामुळे या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यापैकी 150 शिक्षकांनी 25 जूनपासून मुंबईत धरणे व निदर्शने आंदोलन सुरू केले आहे.

‘लातूर जिल्ह्यातील काही शाळांच्या तुकड्या अतिरिक्त ठरल्यामुळे या 235 शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आले आहे, असे आम्हाला शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. मात्र या निर्णयामुळे आमच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेऊन आम्ही आमची कैफियत मांडली. त्यावेळी दर्डांनी पूर्वीप्रमाणेच वेतन नियमित करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळण्यात आले नाही. सरकारने आता तरी या प्रकरणात लक्ष घालून आम्हाला तातडीने नियमित वेतन सुरू करावे,’ अशी मागणी लातूर जिल्हा शिक्षक बचाव कृती समितीचे संतोष सूर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली. ‘शाळेतील मुलांची संख्या घटून तुकड्या अतिरिक्त ठरल्यात आमचा काय दोष? शिक्षण विभागातील अधिकार्‍यांचा कारभारही त्याला जबाबदार असू शकतो. मात्र या अधिकार्‍यांना पदोन्नती व आम्हाला मात्र वेतनापासून वंचित ठेवण्यात आले,’ असा आरोप सूर्यवंशी यांनी केला.

एका शिक्षकाचा मृत्यू : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही हा प्रश्न मांडण्यासाठी जाताना मनोज शिंदे या शिक्षकाचा मृत्यू झाल्याचे ते म्हणाले.