आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण: विनाअनुदानित १६२ शाळांना अनुदान मंजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कायम विनाअनुदान तत्त्वावर मान्यता दिलेल्या राज्यातील १६२ खासगी माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाने या शाळांमधील ८१० शिक्षक आणि ४८२ शिक्षकेतर कर्मचा-यांना अनुदानाचा लाभ होणार आहे.
राज्यात कायम विनाअनुदान तत्त्वावर अनेक शाळांना मान्यता देण्यात आली होती. कालांतराने ‘कायम’ शब्द वगळून या शाळांना अनुदान देण्याचा निर्णय २००९ मध्ये शासनाने घेतला होता. त्यानुसार विहित निकषांची पूर्तता करणा-या शाळांचे प्रस्ताव शासनास सादर करण्यात येत असतात.

सोमवारी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विभागांतील १६२ शाळांना अनुदानास पात्र ठरवले आहे. त्यात विभागातील ४९, पुणे ३४, नाशिक १०, औरंगाबाद ३९, तर नागपूर विभागातील २० शाळांचा समावेश आहे. यात मराठी माध्यमाच्या शाळांबरोबरच उर्दू माध्यमाच्या शाळांची संख्या मोठी आहे.

राजकारण्यांची शाळा
अनुदानातील शाळांमध्ये नेत्यांच्या शाळांची संख्या अधिक आहे. शेकाप आमदार जयंत पाटील (अलिबाग), शेकापचे माजी आमदार विवेक पाटील (पनवेल), राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदे (माढा) आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील (सोलापूर) यांच्या शाळांचा समावेश आहे.