आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पालिका कुंभकर्णी झोपेत: बेकायदा उभारलेल्या बांधकामांच्या वर्षभरात 17 हजार तक्रारी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ठाणे येथे अनधिकृत बांधकाम असलेली 7 मजली इमारत कोसळून 55 व्यक्ती मृत पावल्याची भीषण घटना घडूनही मुंबई पालिका कुंभकर्णी झोपेतून जागे होण्यास तयार नाही. जानेवारी 2012 पासून मुंबई महापालिकेकडे अनधिकृत बांधकामाच्या तब्बल 17 हजार तक्रारी आल्याची धक्कादायक माहिती ‘दिव्य मराठी’ला मिळाली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या 1 कोटी 25 लाख असून सर्व प्रकारच्या 2 लाख 70 हजार इमारती आहेत. पालिकेचे 24 वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डात अनधिकृत बांधकामाच्या दररोज सरासरी 2 तक्रारी येत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये पालिकेकडे केवळ अनधिकृत बांधकामच्या तब्बल 4 हजार 700 तक्रारी आल्या आहेत. यापैकी सर्वाधिक तक्रारी या पश्चिम उपनगरांमधून आलेल्या आहेत. त्यामध्ये अंधेरी, मालाड, कांदीवली, वांद्रे आणि खार या भागाचा समावेश आहे. तर पूर्व उपनगरामध्ये कुर्ला येथून सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
931 इमारती धोकादायक
मुंबई महापालिका क्षेत्रात एकुण 931 इमारती धोकादायक असल्याचा दावा पालिका प्रशासनाचा आहे. पावसाळ्याच्या तोंडावर या धोकादायक इमारतीत राहणार्‍या रहिवाशांना पालिका प्रशासन केवळ नोटीसा पाठवून मोकळी होते. मात्र आपले योग्य पूनर्वसन होणार नाही या भीतीमुळे रहिवासी मोडकळीस आलेल्या इमारतीत जीव मुठीत घेवून जगत आहेत. या धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली अनेक वर्षे लोंबकळत पडला आहे.