आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मापात पाप करणाऱ्या २८४ व्यापाऱ्यांवर गुन्हे, सर्वाधिक ७१ गुन्हे नाशिक विभागात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांना माल विकताना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांकडून वजनात सर्रास फसवले जात असल्याचे उघड झाले आहे. बारामती (िज. पुणे) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वडूजकर अँड कंपनी प्रमाणित वजनाऐवजी चक्क दगड वापरत असून या व्यापाऱ्याविरुद्ध वैधमापन विभागाने खटला दाखल केला आहे.
चुकीचे वजन, मापे वापरून शेतकऱ्यांच्या कृषी मालाची लूट करणाऱ्या राज्यातील १७७ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील २८४ व्यापाऱ्यांवर राज्याच्या वैधमापन विभागाने नुकतीच मोठी कारवाई केली आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील अनेक व्यापारी सदोष वजन, मापे वापरून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करत असल्याच्या तक्रारी वैधमापन विभागाकडे आल्या होत्या.

अडत्यांच्या या लुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे आलेल्या तक्रारींची ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दखल घेतली आहे. बापट यांच्या आदेशानुसार वैधमापन विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी िवभागातील अधिकाऱ्यांना राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील वजन, मापे पडताळणीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्यातील १७७ बाजार समित्यांची २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान तपासणी करण्यात आली. त्यात सुमारे २८४ अडत्यांनी खोटी वजने वापरल्याचे उघडकीला आले. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नोंदलेल्या गुन्ह्यांमध्ये २४१ प्रकरणे वजन, मापां ची मुदतीत फेर पडताळणी केल्याची प्रकरणे असून ४३ प्रकरणे अप्रमाणित वजन वापरल्याची असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
राज्यात कोठेही वजन किंवा मापामध्ये काही शंका असल्यास शेतकरी तसेच ग्राहकांनी वैधमापन विभागाच्या ०२२-२२८८६६६६ या हेल्पलाइनवर किंवा ९८६९६९१६६६ या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा, त्याची दखल तत्काळ घेतली जाईल, असे आवाहन विशेष पोलिस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

कोकण विभागात ११, पुणे विभागात ५७, नाशिक विभागात ७१, औरंगाबाद विभागात ६६, अमरावती विभागात ४१, तर नागपूर विभागात ३८ व्यापाऱ्यांवर अवैध वजन, मापे वापरणे आणि प्रमाणित वजनाची नोंद करणे यासंदर्भात खटले दाखल करण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...