आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१९ लाख ६२ हजार शेतकऱ्यांना १२ हजार कोटींचे पीक कर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यंदा पावसाची स्थिती चांगली राहणार असल्याचा अंदाज विविध वेधशाळांनी वर्तवला आहे. पेरणीपूर्व आणि पेरणीपश्चात कामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या असून २०१६-१७ च्या खरीप हंगामासाठी मे २०१६ अखेर राज्यातील १९ लाख ६२ हजार ६५५ शेतकऱ्यांना १२ हजार ६४ कोटी ९३ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप पूर्ण झाले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देऊन प्रत्यक्ष झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर थकीत पीक कर्जाचे पुनर्गठन करणे, पुनर्गठित झालेल्या कर्जदारास नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देणे, पात्र खातेदारांना पीक कर्ज मिळणे व राज्‍यातील कोणताही शेतकरी पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी विविध उपाययोजना आखण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय बँकर्स समितीने सन २०१६-१७ या वर्षासाठी ५१ हजार २३५ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यापैकी रब्बी पीक कर्ज वाटपासाठी १३ हजार ५६८ कोटी रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे, तर खरीप पीक कर्ज वाटपासाठी ३७ हजार ६७७ कोटी रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे.
राज्यातील खातेदार शेतकऱ्यांची संख्या १ कोटी ३६ लाख ४३ हजार इतकी आहे. या वर्षी ८० टक्के खातेदार शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा करण्याचे शासनाचे नियोजन असून तसे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत सर्व बँकांना दिले आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्जपुरवठा तातडीने उपलब्ध करण्यासाठी तसेच पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत माहिती देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांत शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना केलेल्या पीक कर्ज वाटपाचा आढावाही जिल्हाधिकारी स्तरावर घेतला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...