आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा दोषींना कठोर शिक्षा करा, 1993 मुंबई बाॅम्बस्फोटप्रकरणी सरकार पक्ष करणार मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
मुंबई - १९९३ मुंबई बाॅम्बस्फोटाच्या दुसऱ्या खटल्यात दोषी ठरलेल्या सहा जणांना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी शुक्रवारच्या सुनावणीदरम्यान करणार असल्याची भूमिका विशेष सरकारी वकील दीपक साळवी यांनी सोमवारी विशेष टाडा न्यायालयात स्पष्ट केली. सरकारी पक्षाने आरोपींच्या शिक्षेबाबत प्रथम आपला युक्तिवाद करावा, या बचाव पक्षातर्फे करण्यात
आलेल्या मागणीवर सरकारी पक्षाने ही भूमिका घेतली.    
 
शुक्रवारी सातपैकी सहा आरोपींना विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर सोमवारी त्यांच्या शिक्षेवर युक्तिवाद होणे अपेक्षित होते. त्यानुसार सोमवारी कामकाजाला सुरुवात होताच अगोदर सरकारी पक्षाने आरोपींच्या शिक्षेबाबत युक्तिवाद करावा, त्याआधारे मग आम्ही बचावाबाबतचा युक्तिवाद करू, अशी मागणी आरोपींचे वकील सुदीप पासबोला यांनी केली.    
 
दरम्यान, एक आरोपी फिरोज खान याने न्यायालयासमोर चार अर्ज दाखल केले. खानच्या वतीने बाजू मांडताना अॅड.वहाब खान यांनी शिक्षेबाबतच्या युक्तिवादाच्या मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला. मात्र, न्यायालयाने ही विनंती अमान्य केली. तसेच आपल्यावरील आरोपांचा खुलासा करण्यासाठी तळोजा कारागृहातील दोन ते तीन सहकैद्यांना साक्षीदार म्हणून न्यायालयासमोर हजर करण्याची परवानगी मागितली. ही विनंती मान्य करत न्यायालयाने मंगळवारपासून साक्षीदारांच्या उलटतपासणीला परवानगी दिली. याशिवाय युक्तिवादासाठी न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळावी, या मुस्तफा डोसाच्या विनंतीवरही न्यायालय निर्णय घेणार आहे.    
 
दाऊदसह २७ आरोपी फरार  
या प्रकरणातील दुसरा खटला असून शुक्रवारी विशेष टाडा न्यायालयाने सहा आरोपींना दोषी ठरवले, तर एकाची निर्दोष मुक्तता केली. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या बाॅम्बस्फोटात २५७ लोक मृत्युमुखी पडले होते, तर ७१३ जण जखमी झाले होते. एकूण २७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. हा बाॅम्बस्फोट घडवण्यासाठी ३ हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त १० टक्के आरडीएक्सचा वापर करून हा कट तडीस नेण्यात आला. या प्रकरणात १०० आरोपींना न्यायालयाने पहिल्या खटल्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 
बातम्या आणखी आहेत...