आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील केवळ 20 आमदारच अवयवदानासाठी इच्छुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अवयवदानासाठी अर्ज वितरित केलेल्या 253 आमदारांपैकी केवळ 20 जणांनीच आतापर्यंत अर्ज भरून दिले आहेत. नातेवाइकांच्या संमतीअभावी बहुतांश आमदारांचे अर्ज जमा झालेले नाहीत. मात्र, आपापल्या मतदारसंघांत गेलेले आमदार मुंबईत परतल्यानंतर हा आकडा वाढेल, असा विश्वास आरोग्य विभागातील सूत्रांनी व्यक्त केला.

अवयवदानाबाबत समाजात जागृती वाढावी, यासाठी राज्य सरकारच्या वतीने सप्टेंबर 2012 पासून विशेष मोहीम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अधिवेशनकाळात 253 आमदारांना अवयवदानाचे देण्यात आले. मात्र, अर्जावर नातेवाइकांची संमती आवश्यक असल्यामुळे अद्याप केवळ 20 आमदारांचे अर्ज आले आहेत. उर्वरित आमदार त्यांच्या मतदारसंघांतून परतल्यानंतर अर्ज जमा होण्याची शक्यता आहे.

आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी व राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी अर्ज भरले आहेत. शेट्टी यांच्या 85 वर्षांच्या आईसह पत्नी, मुलगा, मुलगी, बहीण व मेहुणीनेही आरोग्य विभागाकडे संमतिपत्रे सादर केली आहेत. अवयवदान जागृती मोहिमेचा भाग म्हणून वाहन परवान्यासाठी अर्ज करणार्‍या सर्वांकडून अवयवदानाचा अर्ज भरून घेण्यात येणार आहे. महाविद्यालये, चित्रपटगृहे आदी ठिकाणी अवयवदानाचे महत्त्व सांगणार्‍या प्रसिद्धी मोहिमा राबवण्यात येत आहेत.

आठ महिन्यांत 103 ब्रेनडेड
सप्टेंबर 2012 मध्ये राज्य सरकारने विशेष अध्यादेश काढून ब्रेन डेड व्यक्ती घोषित करण्याचे अधिकार डॉक्टरांना दिले. त्यामुळे मागील 8 महिन्यांमध्ये 103 व्यक्तींना ब्रेन डेड जाहीर करण्यात आले. त्यापैकी 35 जणांच्या नातेवाइकांनी अवयवदानाला मान्यता दिली. या ब्रेन डेड व्यक्तींकडून 111 अवयव प्रत्यारोपणासाठी उपलब्ध झाले. त्यात 61 किडन्या, 23 यकृते आणि 27 डोळ्यांचा समावेश आहे.


नगर, परभणीसह पाच जिल्ह्यांत ‘ब्लड ऑन कॉल’ योजना
गरजूंना तत्काळ रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ब्लड ऑन कॉल योजना लवकरच अहमदनगर, परभणी, गडचिरोली, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतदेखील सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत विशिष्ट रंगाचा गणवेश घातलेले मोटरसायकलस्वार गरजूंच्या मागणीनुसार रक्त घेऊन संबंधित ठिकाणी हजर होतात. रक्त सुरक्षित राहावे, यासाठी या मोटरसायकलींना कोल्ड स्टोरेज बॉक्स जोडण्यात आले आहेत.