आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना फोडण्याचा डाव, २० आमदार \'जय महाराष्ट्र\' करण्याच्या तयारीत, मंत्रिपदांचे गाजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादीचा पाठिंबा घ्यावा तर पक्षाची बदनामी होईल आणि शिवसेनेला यापुढे कोणत्याही स्थितीत मोठे करायचे नाही अशी केंद्रीय नेतृत्वाची भूमिका या कात्रीत सापडलेल्या भाजपने शिवसेनेला खिंडार पाडण्याची तयारी चालवल्याची जोरदार चर्चा सोमवारी राजकीय वर्तुळात होती. शिवसेनेचे जवळपास २० ते २२ आमदार फोडून त्यांना शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकणारी मंत्रिपदे व काहींना महामंडळे देण्याची गणिते मांडली जात असल्याचे सूत्रांकडून समजते. काही दिवसांपासून शिवसेनेला सत्तेसाठी झुलवत ठेवणाऱ्या भाजपने शिवसेनेचे आमदार फोडण्याचा घाट घातल्याचे समजते.

"ठाणे'दार एकनाथ शिंदेची तटबंदी
शिवसेनेचे आमदार कुठल्याही परिस्थतीत बाहेर पडू नये, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांभोवती "ठाणे'दार एकनाथ शिंदेची तटबंदी उभी केली आहे. ही तटबंदी म्हणजेच त्यांना दिलेले गटनेतेपद असल्याची सुत्रांची माहिती आहे.

लोक भाजपला जमिनीवर आणतील
शिवसेेनेचे आमदार फोडून विश्वासदर्शक ठरावावेळी बाजी मारायचे हे तर भाजपचे दिवास्वप्न आहे. शिवसैिनक तसेच जनता हे सहन करणार नाही. दलबदलूंना धडा शिकवतानाच लोक भाजपचे विमान जमिनीवर उतरवतील, असे शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याने म्हटले आहे.

भाजपचे असेही बेरजेचे राजकारण....
- शिवसेनेचे पहिल्यांदा निवडून आलेले आणि काँग्रेस, राष्ट्रवादीतून शिवसेनेत जाऊन आमदार झालेल्यांना गळाला लावण्याचा भाजपचा इरादा.

- शिवसेनेचे आमदार फुटून स्वतंत्र गट स्थापन करतील आणि भाजपला पाठिंबा देतील. दोन तृतीयांश म्हणजे ४२ आमदार फुटले तर वैध ठरेल.

- शिवसेनेकडून या फाटाफुटीला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण या लढाईत वेळ जाईल.

- या फुटीर आमदारांना राजीनामा द्यायला लावून पुन्हा भाजपच्या तिकिटांवर निवडून आणता येईल. परंतु हा मार्ग थोडा धोक्याचा ठरू शकतो.

विधानसभाध्यक्षपदाचा वादही रंगणार
विधानसभाध्यक्षांची निवडही १२ नोव्हेंबरला होईल. भाजपकडून फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे यांची उमेदवारी दाखल केली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनाही अध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीने अद्यापही पत्ते उघडलेले नाहीत.

पवारांची शाब्दिक कसरत - विश्वासमतापुरते पाठीशी, पुढे प्रसंगी आमनेसामनेही
राज्यातील भाजप सरकार अस्थिर होऊ नये म्हणून विश्वासदर्शक ठरावापुरताच पाठिंबा देण्याची आमची भूमिका आहे. पुढे एखाद्या विधेयकावर भूमिका न पटल्यास विरोधही करू, अशा शाब्दिक कसरती करत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पाठिंब्याचा पुनरुच्चार करतानाच आपल्या बेभरवशाच्या राजकारणाचा प्रत्यय दिला.
उद्धव यांची धडपड धास्तीने - विरोधात बसण्याची तयारी, परंतु चर्चा अजूनही शक्य
आमदार आपल्यासोबत राहावेत यासाठी उद्धव ठाकरे यांनीही रविवारी त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे विरोधी पक्षात बसण्याची तयारी बोलून दाखवतानाच अजूनही सत्तेसाठी चर्चा होऊ शकते, असे सांगून आमदार फुटणार नाहीत, याची काळजी उद्धव यांनी आमदारांच्या बैठकीत घेतली.

विरोधी पक्षनेतेपद, शिवसेनेचाही दावा
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी विरोधी बाकांवर बसलेल्या शिवसेनेने विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सागितला. सभागृहात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे शिवसेनेला हे पद देण्याची मागणी त्यात आहे. शिवाय सत्तेत न गेल्यास हे पदही हातचे जाऊ नये, असे गणित त्यामागे होते.

भाजपला दोन दिवसांचा अल्टिमेटम
शिवसेनेने भाजपला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याबाबत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा आम्ही विरोधी पक्षात बसू, असे उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीनंतर सांगितले.
काँग्रेसचाही विरोधी पक्षनेतेपदावर दावा
आधी काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला. नंतर शिवसेनेने सांगितला. एकीकडे भाजपला अडचणीत आणतानाच काँग्रेसला हे पद मिळू नये असा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे समजते.
काँग्रेस गटनेतेपदी विखे
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड झाली. विखे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधक मानले जातात.
पुढे वाचा, ‘मियाँ खडसें’साठी रावतेंनी आणली हिरवी टोपी