आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिट अँड रन प्रकरण: सलमानच्या ड्रायव्हरचा जबाब, \'सलमान नव्हे मी चालवत होतो गाडी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 2002 साली मुंबईत झालेल्या हिट अँड रन प्रकरणाला आज वेगळीच कलाटणी मिळाली. अभिनेता सलमान खानच्या गाडीचा चालक अशोक सिंह याने त्या रात्री आपणच गाडी चालवत होतो अशी साक्ष कोर्टात नोंदवली आहे. त्या रात्री माझ्या हातूनच अपघात झाला. यात सलमानचा काहीही दोष नाही. मी पोलिसांना याबाबत माहिती देत होतो पण पोलिसांनी माझ्याकडून माहिती घेण्यास टाळाटाळ केली होती. मला माझा गुन्हा कबूल आहे असा जबाब देत अशोकने साक्ष दिली. दरम्यान, अशोकच्या जबाबामुळे सलमान खानच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी या घटनेतील सर्व साक्षीदार व खुद्द सलमान खान यानेही आपणच गाडी चालवत असल्याचे जबाब दिले होते.
शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सेशन कोर्टाच्या न्यायाधिश डी. व्ही. देशपांडे यांच्यासमोर सलमान खानने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत अपघातावेळी आपण गाडी चालवत नव्हतो आणि मद्यपानही केले नव्हते, असा जबाब नोंदवला होता.
आपली बाजू मांडताना सलमान म्हणाला होता, अपघाताच्या वेळी माझा ड्रायव्हर अशोक सिंह गाडी चालवत होता. अपघातात डाव्या बाजूचा दरवाजा उघडत नसल्याने मी चालकाच्या सीटवर काही वेळासाठी बसलो होता. मात्र, आपण गाडी चालवली नाही, अशी साक्ष दिली. अपघात झाला त्याआधी आपण बारमध्ये गेलो होता. मात्र, तिथे केवळ पाणी पिले. तसेच बारमधील बिल आपले नसल्याचेही त्याने सांगितले. अपघातावेळी डोळे लाल का होते? असे विचारले असता त्याने आपण अपघात झाल्यामुळे रात्रभर मी झोपलो नव्हतो, असे उत्तर दिले. अपघात झाल्यानंतर आपण 15 मिनिटे घटनास्थळी होतो. मात्र, संतप्त लोकांचा जमाव वाढू लागल्याने एका मित्राने आपल्याला घटनास्थळावरून निघून जाण्यास सांगितले. न्यायाधीश देशपांडे यांनी सुनावणी दरम्यान सलमानला 418 प्रश्न विचारले. तब्बल तीन तास तो या प्रश्नांची उत्तरे देत होता.
काय आहे प्रकरण ?
2002 मध्ये सलमानने भरधाव गाडी चालवून पदपथावरील पाच जणांना चिरडले होते, असा अाराेप अाहे. यात एकाचा मृत्यू झाला तर चाैघे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आहे. आतापर्यंत या प्रकरणात 27 साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे. आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी येत्या 1 एप्रिल रोजी होईल. सलमान खानवर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला किमान 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.