(छायाचित्र- आयआयटी पवईचा परिसर)
मुंबई- मुंबईतील IIT पवईमधील इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रितेश शर्मा असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून तो केमिकल इंजिनीयरिंगच्या तिस-या वर्षांत शिकत होता. रितेश मूळचा हरियाणामधील रोटक येथील होता.
पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश IIT पवई कॅम्पसमधील 8 क्रमांकाच्या हॉस्टेलमध्ये राहात होता. शनिवारी रात्री सगळे मित्र बाहेर गेले असताना त्याने हॉस्टेल क्रमांक 15 मध्ये जाऊन आत्महत्या केली. रितेश तिस-या वर्षात शिकत असला तरी त्याचा पहिल्या वर्षाचे एक-दोन पेपर राहिले होते. त्यामुळे तो तणावात होता. त्यातच तिस-या वर्षाची नुकतीच परीक्षा झाली होती. ती ही त्याला अवघड गेली होती. मागील सेमिस्टरचे विषय शिल्लक राहिल्यामुळे एफआर (फेलिंग रेट) मिळण्याच्या भितीमुळे तो तणावाखाली होता. त्यातच सध्या तिस-या वर्षांतील विद्यार्थ्यांना अनेक कंपन्या समर इंटर्नशिपसाठी घेत होत्या. त्या ठिकाणीही रितेशची निवड न झाल्याने तो आणखीच निराश झाला होता. अखेर या सर्व बाबींना कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. रितेशने मृत्यूपूर्वी लिहिलेले सुसाईट नोट पोलिसांना मिळाली आहे.
आपण या क्षेत्रात यायला नको होते. जेईई परीक्षा पास होऊन आपण मोठी चूक केली असे सुसाईट नोटमध्ये रितेशने लिहून ठेवल्याचेही पोलिसांनी सांगितले.