मुंबई- मुंबईतील काळाचौकी परिसरात एका 21 वर्षीय गतिमंद तरुणीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सलीम शेख (21), राहुल मंडल (20) आणि पंचू गणेश डोकी (25) अशी तीन नराधमांना गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांनी अटक केली आहे.
हे तिघेही नराधम एका ज्वेलर्सच्या दुकानात कामगार आहेत. ही तरुणी मानसिकदृष्ट्या काही अंशी विकलांग असून तिच्यावर बलात्कार करणा-या तिघांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. या तरूणीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या तिघा नराधमांना कोर्टाने 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी भागात राहणारी 21 वर्षीय गतिमंद तरुणी रे रोड येथील दर्ग्यात दर्शनास आली होती. दर्शनास उशीर लागल्याने रात्री दहाच्या सुमारास तिने रे रोड रेल्वे स्थानक गाठले. मात्र घरी जाण्यास झालेला उशीर, त्यात लोकल निघून गेल्याने ती दुस-या गाडीची वाट पाहत फलाटावर बसली. याचवेळी या तीन नराधमाची नजर तिच्यावर पडली. थोड्या वेळानंतर आम्ही तुला सोडतो सांगून या नराधमांनी तरूणीला कॉटन ग्रीनजवळ आडोशाला घेऊन गेले.
त्यानंतर या तिघांनी तिच्यावर एका ट्रकमध्ये बलात्कार केला. यावेळी या तरुणीने आरडाओरड केल्यामुळे ट्रकचा चालक घटनास्थळी दाखल झाला. त्याचवेळी नागरिकही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले. ट्रक चालकाने याची माहिती काळाचौकी पोलिसांना दिली. गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांनी तरुणीची नराधमांच्या तावडीतून सुटका करीत दोघांना जागेवरच पकडले. त्यावेळी सलीम तेथून निसटून जाण्यात यशस्वी झाला. मात्र, पोलिसांनी या दोघांकडून घेतलेल्या माहितीवरून सलीमलाही अटक केली. दरम्यान, मुंबईसारख्या शहरातही महिला सुरक्षित नसल्याने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.