आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६/११ च्या ‘हीरो’ची पर्यावरणस्नेही चळवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लख्वी याला पाकिस्तानी न्यायालयाने जामीन दिला आणि पुन्हा एकदा २६/११च्या आठवणी जागवल्या गेल्या. या हल्ल्यात शहीद झालेले तुकाराम ओंबाळे यांना साथ देताना कसाबला जिवंत पकडण्यासाठी जिवाची पराकाष्ठा केलेल्या संजय गोविलकरांनी आरंभलेल्या जनचळवळीविषयी...

पोलिस दलातील अधिकारी म्हटला की गुन्हेगारांचा पाठलाग करणारा, आपला बरा-वाईट दरारा निर्माण करून ‘सद् क्षणाय-खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य जगण्याचा प्रयत्न करणारा, तर कधी प्रचंड माया जमवणारा भ्रष्ट अधिकारी, अशी प्रतिमा सामान्यांच्या मनात उभी राहते. सामान्यांचे रक्षण करणे हे कर्तव्य प्रामाणिकपणे व जिवावर उदार होऊन पार पाडणारा एक पोलिस अधिकारी याहीपलीकडे विचार करून पर्यावरण रक्षणाची आगळीवेगळी चळवळ उभारतो तेव्हा पोलिस दलच नव्हे, तर त्याच्याशी संबंधित सर्वांचीच मान उंचावते.

समाजातही हीरो...
गोविलकर सध्या मुंबई पोलिसात गुन्हे शाखेत निरीक्षक आहेत. २६/११चा हल्ला झाला तेव्हा ते लॅमिंग्टन रोड ठाण्यात होते. क्रूरकर्मा कसाब व त्याच्या सहकाऱ्याची गाडी ओंबाळे व इतरांनी गिरगाव चौपाटीवर अडवली तेव्हा ओंबाळेंनी कसाबची बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शहीद झाले. गोविलकर यांना कसाब जिवंत हवा होता. त्यांनी कसाबची रवानगी रुग्णालयात केली. नंतर गोविलकरांच्या पोटात व पाठीत गोळ्या घुसल्याचे निष्पन्न झाले. कसाबला जिवंत पकडताना गोळी लागल्याचेही भान त्यांना नव्हते. या शौर्याबद्दल त्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

शवदाहिनी योजना
गडहिंग्लज तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात अशीच परिस्थिती असल्याने गोविलकर यांनी गावागावांना भेटी दिल्या. ग्रामस्थांशी चर्चा केली. जवळपास ९६ गावांपैकी सुमारे ६६ गावांमध्ये याच पद्धतीने अंत्यविधी केले जातात आणि याच समस्यांमधून त्या ग्रामस्थांना जावे लागते, हे त्यांच्या ध्यानात आले. यातूनच ‘शवदाहिनी’ ही योजना साकारली. लोखंडाचा वापर करून अंत्यविधीसाठी तयार केलेली एक चौकट म्हणजे शवदाहिनी.
अंत्यविधींचा क्लेश : पोलिस निरीक्षक संजय गोविलकर यांच्या आजीचे २००८ मध्ये कोल्हापूर जिह्यातील नांगनूर (ता. गडहिंग्लज) या गावात निधन झाले. गावामध्ये पूर्वापार पद्धतीनुसार शेतावर किंवा माळरानावर उघड्यावर अंत्यविधी व्हायचे. आजही हीच पद्धत आहे. एका अंत्यविधीसाठी साधारण ५०० ते ६०० किलो लाकूड आणि ५ लिटर रॉकेल लागते. कधी कधी सरपण पेट घेत नाही म्हणून लाकडासोबत जुने टायर वगैरे आगीत टाकले जातात. खर्च होतो पन्नास ते साठ हजार रुपये. दुस-या दिवशी विसर्जनासाठी लागणा-या अस्थी मिळवणे कठीण जाते. कारण हा भाग बंदिस्त नसल्याने गुराढोरांचा मुक्त संचार असतो.

... अन् चळवळ फोफावली
आजपर्यंत सातारा जिल्ह्यातील दहिवडी आणि कोल्हापूरमधील खटनाळ या गावांमधून अशा ‘शवदाहिन्या’ बांधल्या आहेत. हळूहळू ही चळवळ गोविलकरांच्या आप्तस्वकीय आणि समविचारी मित्रांमध्ये पसरली. आज या चळवळीशी अनेक लोक जोडले गेले आहेत. ही चळवळ सुरू असतानाच गोविलकर ‘जीवनरंग’ या संस्थेच्या माध्यमातून पुस्तक प्रकाशन, भारतजोडो चळवळ, जीवनप्रवाह, व्याख्यानमाला आणि रक्तदान शिबिरे अशा चळवळी उभारत आहेत. गोविलकरांच्या अनुभवांच्या आधारे लिहिलेले ‘स्टॉपवॉच’ हे पुस्तक तर नियमित जीवनशैली जगू इच्छिणा-या नागरिकांसाठी अतिशय उपयुक्त ठरले आहे.

खर्च, लाकूड यातून बचत : गोविलकर : एका मनुष्याला आयुष्यकाळात संतुलित आणि आरोग्यमय जीवनासाठी सर्वसाधारणपणे नऊ झाडांची आवश्यकता असते, परंतु आज माणसी फक्त तीन झाडे उपलब्ध आहेत. तेव्हा अंत्यविधीसाठी कमी लाकूड वापरणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या पर्यावरणाला मदत करणे आहे. एक शवदाहिनी उभारायला सुमारे ७५ हजार रुपये लागतात. यासाठी सध्या जीवनरंग या संस्थेमार्फत दानशूरांकडून देणगी मिळवली जाते, असे गोविलकर यांनी सांगितले.

असा झाला लाभ
*‘नांगनूर’ या आपल्या मूळ गावापासून गोविलकरांनी योजनेचा प्रारंभ केला. या नव्या ‘शवदाहिनी’च्या वापरामुळे अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड अर्ध्यापेक्षा कमी म्हणजेच, सुमारे २०० ते २५० किलो इतकेच लागते.
*ब-याचदा रॉकेलची गरजही पडत नाही. सरण अगदी नीट व कमीत कमी श्रमात रचता येते. पावसाळ्यातसुद्धा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतात. खर्चामध्ये खूपच बचत होते.

अंत्यविधी सुकर झाला : गावकरी
नांगनूर येथील एक गावकरी संदीप कापसे यांनी सांगितले, की पूर्वी आम्हाला सुमारे १२ मण लाकूड अंत्यविधीसाठी लागत असे. परंतु शवदाहिनीमुळे आता फक्त पाच ते सहा मणच लाकूड लागते. एवढेच नव्हे, तर अंत्यविधीनंतर अस्थी गोळा करणेदेखील सोपे झाले आहे.