आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६/११ मुंबई हल्ल्याच्या सर्व दहशतवाद्यांना गजाआड टाका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्रे - २६/११ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचे परिणाम आजही जगभर दिसत आहेत. या हल्ल्याच्या सातव्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रानेही मतप्रदर्शन केले आहे. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील सर्व अतेरिकी सूत्रधारांना अटक करून कायद्याच्या कचाट्यात आणायला हवे, असे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान संबंधावरही त्यांनी बाजू मांडली. भारत आणि पाकिस्तानातील संबंध चांगले झाल्यास दहशतवादाशी लढता येऊ शकते, असे त्यांनी म्हटले. संयुक्त राष्ट्रात आयोजित एका कार्यक्रमाच्या प्रश्नोत्तरांच्या कालावधीदरम्यान मून बोलत होते. पाकिस्तानने त्यांच्या भूमीतून सुरू असलेल्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालायला हवी, असा प्रश्न मून यांना या वेळी करण्यात आला. दरम्यान, आपण संबंधित देशांच्या कायदा व सुव्यवस्थेवर भाष्य करणार नाही. मात्र, दहशतवादी हल्ल्याच्या सर्व सूत्रधारांना कायद्याच्या चौकटीत आणायला हवे. भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या चांगल्या संबंधांनी दहशतवादाशी लढा देणे सोपे जाईल. दोन्ही देशांत सकारात्मक वातावरण तयार व्हायला हवे, असे मून या वेळी म्हणाले.
मास्टरमाइंड मोकाटच
२६/११ मुंबई दशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड व लष्कर ए तोयबाचा म्होरक्या झकी-उर-रहमान लखवी याची पाकच्या न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी सुटका केली. त्याला २००९ मध्ये अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्याच्या सुटकेनंतर भारताने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रापुढे मांडला होता. यावर मून म्हणाले की, लखवीला सोडण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता. भारताने केलेल्या तक्रारीनुसार संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीसमोर या मुद्द्यावर चर्चाही झाली.
दहशतवादामुळे नुकसान
मून पुढे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेसाठी दहशतवाद हा सर्वांत मोठा धोका आहे. यामुळे जगभरात रोज मोठे नुकसान होत आहेत. लेबनाॅन आणि पॅरिसमध्ये नुकतेच करण्यात आलेले दहशतवादी हल्ले याचे उदाहरण आहेत.
इसिसविरोधात मुस्लिम धर्मगुरू एकत्र
मुंबई - इसिस इस्लामविरोधी संघटना असल्याची घोषणा माहिम दर्ग्यात आयोजित सर्वधर्मीय सभेत मुस्लिम धर्मगुरुंनी केली. देश दहशतवादमुक्त करावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी पंतप्रधानांना केले.

इस्लाममध्ये दहशतवाद किंवा हिंसेला स्थान नाही. ‘इसिस’विरोधात आवाज उठविण्यासाठी माहीम दर्ग्याच्या विश्वस्तांनी सर्वधर्मीय सभेचे आयोजन केले होते. ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनामुळे संपूर्ण इस्लाम धर्माकडे आणि मुस्लिम समुदायाकडे संशयित नजरेने पाहिले जाते. ज्या इस्लाममध्ये पाणीसुद्धा फुकट घालवू नका, असे सांगितले तेथे रक्त सांडायला कसे शिकविले जाईल, असा प्रश्न इस्लामचे अभ्यासक मन्सूरसाहेब यांनी यावेळी विचारला.