आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 26 11 Mumbai Terror Attacks Bulletproof Jacket Buy Explained

बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी रखडली, नेत्यांना मात्र ४ महिन्यांत गाड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईवरील २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात सदोष बुलेटप्रूफ जॅकेटमुळे एटीएसचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांना आधुनिक यंत्रसामग्री देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. आता, २६/११ ला ७ वर्षे उलटली आहेत. पोलिसांसाठी ५ हजार बुलेटप्रूफ जॅकेट्सच्या खरेदीची प्रक्रिया चार वर्षे रखडलेली आहे. दुसरीकडे, नेत्यांच्या बुलेटप्रूफ गाड्यांच्या खरेदीसाठी मात्र अवघ्या चारच महिन्यांत झटपट निर्णय घेत कोट्यवधींच्या खर्चाला मंजुरी दिली जात आहे. शासनाची ही असंवेदनशीलता माहिती अधिकाराद्वारे उघड झाली आहे. जीव धोक्यात घालून अतिरेक्यांचा सामना करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दृष्टिकोनातून बुलेटप्रूफ जॅकेट महत्त्वाचे आहे. निकृष्ट जॅकेटमुळे हेमंत करकरे यांना जीव गमावावा लागला होता. त्यानंतर पोलिस अत्याधुनिकीकरणाच्या नावाखाली २०११ मध्ये उच्च दर्जाच्या तब्बल दोन हजार बुलेटप्रूफ जॅकेट्सची खरेदी झाली. मात्र, पोलिस दलाला अजून पाच हजार जॅकेट्सची आवश्यकता आहे. असे असतानाही सन २०११ पासून अद्याप निधीच्या तुटवड्याचे कारण देत ही खरेदी वारंवार पुढे ढकलली जात आहे. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाली असून खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे कारण सांगितले जात आहे.

चारच महिन्यांत खरेदीचा निर्णय
दोन बुलेटप्रूफ वाहने खरेदीसाठी सामान्य प्रशासन विभागाने १७ नोव्हेंबर २०१५ रोजी खर्चाच्या मंजुरीबाबतचा शासन निर्णयच जारी केला आहे. आणि उल्लेखनीय बाब म्हणजे हा प्रस्ताव फक्त चारच महिन्यांपूर्वी म्हणजेच जून २०१५ मध्ये मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. म्हणजे एकीकडे देशांतर्गत सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सामग्रीच्या खरेदीचे निर्णय चार वर्षांनंतरही होत नसताना राजकारण्यांच्या सुरक्षेसाठीचे निर्णय मात्र चारच महिन्यांत घेतले जात आहेत.