आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 300 Ton Food Grain Distributed To Drought Affected Peoples By Bhaskar Group

दिवाळीसाठी ३०० टन अन्नधान्याचे वाटप, दिव्य मराठीचे राज्यपालांकडून कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दहा राज्ये…३६ शहरे आणि सुमारे दीड लाख लोकांकडून जमा करण्यात आलेल्या ३०० टन धान्य वितरणाचा शुभारंभ शुक्रवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे पार पडला. भास्कर समूहाने सुरू केलेल्या या अन्नदान मोहिमेला राज्यपालांनी "फ्लॅग ऑफ' दाखवल्यानंतर धान्याची गाडी मराठवाड्याच्या दिशेने रवाना झाली.
राज्यातील दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मराठवाड्यातील १२५ गावांमधील १८ हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी हे धान्य भास्कर समूहाच्या "दिव्य मराठी' तर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वितरित करण्यात येणार आहे. भास्कर समूहाच्या या अन्नदान मोहिमेचे कौतुक करताना राज्यपालांनी असे अभिनव उपक्रम मर्यादित काळासाठी न ठेवता ते कायमस्वरूपी आखण्यात यावेत, असे आवाहन केले.
भास्कर समूहाच्या अन्नदान उपक्रमाची सखोल माहिती घेत हे धान्य कसे वितरित केले जाणार आहे, याबद्दल राज्यपालांनी "दिव्य मराठीचे' सीओओ निशित जैन यांच्याकडून याप्रसंगी जाणून घेतले. मंत्री म्हणून कार्यरत असताना असाच उपक्रम त्यांनी आंध्र प्रदेशात आदिवासी आणि गरजू शेतकऱ्यांसाठी राबवल्याची माहिती राज्यपालांनी शिष्टमंडळाला दिली. निशित जैन यांच्या सहकाऱ्यांत "दिव्य मराठी'च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी, नाशिक आवृत्तीचे ब्रँड मॅनेजर हेमंत पवार, औरंगाबादचे ब्रँड हेड अदनान कनोरवाला, मुंबईचे डेप्युटी एडिटर प्रशांत पवार आणि राज्यपालांचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर उपस्थित होते.
या वेळी ‘नाशिक कुंभ मेळा’ हे "दिव्य मराठी'तर्फे प्रकाशित ‘कॉफीटेबल बुक’ जैन, पवार यांच्या हस्ते राज्यपालांना भेट देण्यात आले. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांसाठी गेल्या वर्षी भास्कर समूहातर्फे वस्त्रदान उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत ४५ हजार पूरग्रस्तांना दीड लाख उबदार वस्त्रांचे वाटप करण्यात आले होते.