आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅ. तात्या लहाने चित्रपटातील गाणे 324 गायकांनी गायले; विक्रमाची ‘गिनीज बुक’मध्ये नाेंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डाॅ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर आधारित ‘डाॅ. तात्या लहाने - अंगार - पॉवर दी विदिन’ या चित्रपटातील एक गाणे राज्याच्या विविध भागांतील ३२४ गायक- गायिकांनी बुधवारी रिले सिंगिंग प्रकारात गायले. या विक्रमाची गिनीज बुक अाॅफ वर्ल्ड रेकाॅर्डनेही नाेंद घेतली अाहे. याआधी २९६ गायकांनी रिले सिंगिंग केल्याच्या विक्रमाची नाेंद हाेती, ताे विक्रम अाता माेडला अाहे.   
 
नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा भव्य कार्यक्रम झाला. “डॉ. तात्या लहाने’ यांच्यावरील चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले अाहे. या बहुचर्चित रिले सिंगिंगसाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून ३२४ गायकांची निवड करण्यात आली होती. सात ते सत्तर वर्षांपर्यंतचे गायक रिले सिंगिंगसाठी सज्ज झाले होते. त्या गायकांमधे कोल्हापूरचे आमदार सुजित मिणचेकर यांचाही सहभाग होता. या कार्यक्रमाला वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री गिरीश महाजन उपस्थित हाेते.

ते म्हणाले, ‘डाॅ. लहाने हे ध्येयवेडे आहेत. काही माणसे प्रसिद्धीसाठी जगतात, तर काही लोक विक्रमासाठी जगतात.  पण डाॅ.  लहाने हे आपल्या कार्याशीच कटिबद्ध आहेत. ते अहोरात्र कार्यमग्न असतात. त्यांनी नेत्र शस्त्रक्रिया करून हजारो लोकांना पुन्हा दृष्टी प्रदान केली. त्यांचे समाजकार्य महान आहे. त्यांनी केलेली समाजाची सेवा अलौकिक आहे.’  या कार्यक्रमाला अभिनेत्री अलका कुबल याही उपस्थित होत्या. त्यांनी या चित्रपटात डॉ. तात्याराव लहाने यांच्या पत्नीची, तर मकरंद अनासपुरे यांनी तात्यारावांची भूमिका केली अाहे. या सिनेमाची कथा-पटकथा- संवाद विराग यांनी स्वतः लिहिले असून सिनेमाचे संगीत ‘एक हिंदुस्थानी’ या संगीतकाराने केले आहे.  

मराठवाड्यातील २४ गायकांचा समावेश
‘काळोखाला भेदून टाकू... जीवनाला उजळून टाकू!...’ हे विराग यांनी लिहिलेले १०८ शब्दांचेे गाणे ३२४ गायकांनी सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत व एक शब्द एक गायक या पद्धतीने सलग तीन वेळा गायले. गायकांची निवड करण्यासाठी राज्यभर ऑडिशन्स घेण्यात अाल्या हाेत्या. त्यातून निवडलेले मुंबई/ ठाणे (१२५), पुणे (१८), नाशिक (१२), सांगली (७), धुळे (२०), जळगाव (३०), जालना (६), अकोला (११), अमरावती (१७), नागपूर (११), वाशिम (१५), लातूर (१६), परळी (२), कोल्हापूर(८) सोलापूर (३) असे एकूण ३२४ उत्तम गायक या उपक्रमात सहभागी झाले होते.
 
बातम्या आणखी आहेत...