आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 39 People Died In Mumbai Local Railways Last 3 Days

मुंबई लोकल रेल्वे लाईफ लाईन नव्हे मृत्यूचा सापळा, 3 दिवसांत 39 जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी उपनगरीय रेल्वे सेवा मुंबईकरांच्या जीवावर उठली आहे. असे म्हणण्याचे कारण हे की, मागील तीन दिवसात मुंबई लोकलने तब्बल 39 जणांचा जीव घेतला आहे. यातील बहुतांश जणांना लोकल खाली येऊन प्राण गमवावे लागले आहेत. सोमवारी केवळ एका दिवसात 16 जण मरण पावले आहेत. एकूनच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. जगभर वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांनी केलेल्या हल्ल्यात मारले गेलेल्या नागरिकांपेक्षा जास्त मुंबईकर लोक लोकल रेल्वेखाली येऊन मारले जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवर मागील तीन दिवसात 50 हून अधिक अपघात झाले आहेत. त्यात 39 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 30 हून अधिक जण जखमी आहेत. यापैकी बरेच लोक हे रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडले आहेत. यात काही महिलांचाही समावेश आहे.
मुंबईची लोकल रेल्वे सेवा मुंबईची लाईफ लाईन समजली जाते. सव्वा ते दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात दररोज 65 लाख लोक उपनगरीय रेल्वेने प्रवास करतात. यातील मध्य आणि पश्चिम रेल्वेने 50 लाखांहून अधिक लोक प्रवास करतात. मुंबई शहराचा वाढता पसारा पाहता उपनगरीय रेल्वे सेवेच्या प्रवासातून नागरिकांची कशी सुटका करायची हा सर्वच यंत्रणांपुढे पडलेला यक्षप्रश्न आहे. यासाठीच मुंबई मेट्रो, मोनोरेलचे प्रोजेक्ट राबवले जात आहेत. बेस्टच्या बसेसची संख्या वरचेंवर वाढवली जाते. मात्र, लोकांची गर्दी व प्रवाशांची वाढ आता नित्याचीच बाब होत चालली आहे. वेळेत पोहचण्यासाठी चाकरमनी कशाचीही तमा न बाळगता प्रवास करीत असतात. यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यातही रेल्वे मार्ग ओलांडताना सर्वाधिक लोक मृत्यूमुखी पडत आहेत.
मुंबईत दररोज सरासरी 10 ते 12 लोक मुंबई लोकल अपघातात मृत्यूमुखी पडतात. वर्षभराचा आकडा काढला तर ही संख्या तीन-साडेतीन हजाराच्या घरात जाते. सध्या जगात दहशतवादाने सर्वाधिक मारले जातात असे सांगितले जाते. मात्र, त्यापेक्षाही मुंबईत उपनगरीय रेल्वे अपघातात जास्त लोक मारले जात असल्याचे वास्तव पुढे आले आहे. तेव्हा मुंबईकरांनो लोकलने प्रवास करताय?, मग सावधान राहा व आपली काळजी घ्या एवढेच आपल्या हातात आहे.