आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 4 FSI For Police Quarter, Next Two Years New One Home For Police

पोलिसांच्या घरांसाठी चार चटई क्षेत्र निर्देशांक, दोन वर्षांत एक लाख घरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यातील पोलिसांच्या घरांसाठी चार चटई क्षेत्र निर्देशांक देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून या निर्णयामुळे राज्यातील पोलिसांसाठी पुढील दोन वर्षांत एक लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.
याबाबतच्या प्रस्तावास शुक्रवारी ( ता. 20) मंजुरी देण्यात आली आहे. जुनी तसेच इतर ठिकाणी पोलिसांच्या घरांचा पुनर्विकास करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पोलिसांसाठी सुमारे 1 लाख 22 हजार 952 घरांची आवश्यकता आहे. गेल्या वर्षभरात राज्यात पोलिसांसाठी 15 हजार 579 घरे बांधण्यात आली आहेत. गुरूवारी गृह विभागाची आढावा बैठक घेण्यात आली, यात याबाबतची आकडेवारी सादर करण्यात आली होती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर राज्यातील इतर महानगरपालिका क्षेत्रातील विकास नियंत्रण नियमावलीमध्ये शासन, शासनाचे प्राधिकरण, महापालिका यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरांबद्दल नियम अंतर्भूत करण्यात आले आहेत. यानुसार या क्षेत्रातील भूखंडाचे क्षेत्र चार हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्याठिकाणी चार चटई क्षेत्र देण्यात येणार आहे.
खासगी विकासक किंवा जमीनमालक यांच्या जमिनीवर कर्मचारी निवासाचे बांधकाम करून देण्यास तयार असतील त्यांनाही प्रोत्साहनात्मक चटई क्षेत्र निर्देशांक दिला जाणार आहे. ही योजना किफायतशीर आणि व्यवहार्य व्हावी, यासाठी चटई क्षेत्र निर्देशांकाच्या एक-तृतीयांश चटई निर्देशांक वाणिज्यिक विक्री करावयाच्या सदनिकांसाठी मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील पोलिसांना दोन वर्षांत एक लाख घरे उपलब्ध होणार असून पोलिसांच्या घरांचा अनेक वर्षांपासून प्रतिक्षेतील प्रश्न निकाली लागणार आहे.