मुंबई - पश्चिम दादरमधील फुल बाजारातील 'अहमद उमर' या चार मजली इमारतीला आज (शुक्रवार) पहाटे 3 वाजताच्या सुमारास अचानक मोठी आग लागली. या दुर्घटने दोन व्यक्ती गंभीर भाजल्या आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवले.
ही इमारत 100 वर्षे जुनी आहे. या ठिकाणी अनेक कुटुंबं राहतात. शुक्रवारी पाहाटे इमारतीला भीषण आग लागली. या बाबत इमारतीमधील रहिवाशांनी तत्काळ अग्नीशमन विभागाला माहिती दिली. अग्नीशमनच्या जवानांनी 16 फायर इंजिन आणि आठ वॉटर टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. इमारतीतील सर्व कुटुंब सुखरूप असून, सकाळी 6 वाजतापर्यंत कोम्बिंग ऑपरेशन सुरूच होते.
मीटर रुममध्ये पडली ठिणगी
इमारतीच्या तळमजल्यावरील मीटर रूममध्ये आगीची ठिणगी पडल्याचे काही रहवाशांनी सांगितले. दरम्यान, काही मिनिटांतच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले.
कांदिवलीतील झोपडपट्टीमध्येही आग
गुरुवारी मध्यरात्री कांदिवलीतील एमजी रोडवरील जलतरण तलावावळील झोपडपट्टीला रात्री साडे सातच्या सुमारास आग लागली होती. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे आठ बंब घटनास्थळी दाखल झाले. येथील दुकानांमध्ये गॅस सिलेंडरमुळे आग भडकल्याचे सांगण्यात आले. तीन तास ही आग चालू होती, शर्थीच्या प्रयत्नांनी आग विझवण्यात आली.