आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 टक्के नोटा ग्रामीण क्षेत्रात पाठवण्याचे निर्देश, नोटा 500 किंवा कमी मूल्याच्या हव्या : रिझर्व्ह बँक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नोटाबंदीनंतर शेतकऱ्यांना झालेल्या त्रासामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने कमीत कमी ४० टक्के नोटा ग्रामीण क्षेत्रात पाठवण्याचे निर्देश सर्व बँकांना दिले आहेत. या नोटा ५०० रुपये किंवा त्या पेक्षा कमी मूल्य असलेल्या हव्यात. सध्या बँकांच्या वतीने ग्रामीण क्षेत्रात पाठवण्यात येत असलेल्या नोटा पुरेशा नसल्याचे मतही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केले आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रीय बँका, जिल्हा सहकारी बँका, इतर बँकांच्या ग्रामीण शाखा, एटीएम आणि पोस्ट कार्यालयात प्राथमिकेच्या आधारावर नोटांचा पुरवठा करण्याची आवश्यकता असल्याचे मत रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशात व्यक्त केले आहे. 
 
या आधीदेखील रिझर्व्ह बँकेने ग्रामीण भागात नोटा पोहोचवण्यासंदर्भात निर्देश दिले होते. मात्र, नोटांची कमतरता असल्यामुळे ग्रामीण भागात जास्त नोटा पोहोचवण्यात आल्या नाहीत. आता रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नोटांपैकी ४० टक्के नोटा ग्रामीण भागात पाठवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नोटा पाठवल्यानंतर त्या नोटांच्या पावतीसह आठवड्याचा अहवाल दर शुक्रवारी रिझर्व्ह बँकेला पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
 
प्रत्येक जिल्ह्यातील नोटांची मागणी एकसमान असणार नाही. त्यामुळे बँकांनी मागणीप्रमाणे नोटांचे वितरण करावे, असेही रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशात सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतरही नोटांचा पुरवठा सामान्य झालेला नाही. त्यामुळेच सरकारच्या वतीने आठवड्यात २४,००० रुपये काढण्याची मर्यादा वाढवण्यात आलेली नाही. त्यामुळे बाजारात अजूनही चलन तुटवडा जाणवत आहे.

भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अहवाल मागवला
नवी दिल्ली- नोटाबंदीच्या निर्णयानंतर अवैध मार्गाने नोटा बदलून देणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकाऱ्यांचा अहवाल देण्याचे आदेश अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना दिले आहेत. या आरोपाखाली आधीच अनेक बँक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआय तसेच इतर तपास संस्था या प्रकरणांचा तपास करत आहेत. यादरम्यान वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकदेखील बँकांच्या शाखेच्या पातळीवर असलेल्या कमतरतेचा तपास करू शकते.   
बातम्या आणखी आहेत...