आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान! पाकीट मारणार्‍यांमध्ये 40 टक्के महिला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘पाकीटमारांपासून सावधान!’ हे वाक्य आपल्याला बस, रेल्वे, गर्दीची ठिकाणे यासह अनेक जागी लिहिलेले आढळते. पण अशा प्रकारचे गुन्हे करण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल झालेले असून त्याबाबत मात्र आपण अनभिज्ञच असतो. विशेष म्हणजे महिलाही पाकीट मारण्यासारख्या प्रकारांमध्ये सहभागी असल्याचे समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच आझाद मैदान येथे पोलिसांनी बेस्टच्या बसमध्ये पाकीटमारी करणार्‍या आठ महिलांना अटक केली होती. या महिला नेहमी गटाने प्रवास करतात. इतर महिलांप्रमाणेच चांगले राहणीमान असल्याने त्यांच्याकडे कोणाचे लक्षही जात नाही. मुंबईत पाकीट मारणार्‍यांमध्ये 40 टक्के महिला असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. शहर आणि रेल्वे पोलिसांत रोज पाकीट मारले जाण्याच्या किमान दहा तक्रारी दाखल होतात. म्हणजेच त्यापैकी किमान चार पाकिटे महिलांनी चोरलेली असतात.

महिला पाकीटमार पुरुष पाकीटमारांपेक्षा अधिक चलाख असल्याचे मतही काही पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केले. त्याचे कारण म्हणजे महिला पाकीटमार नेहमी किमान तिघी ते चौघींच्या गटाने चोर्‍या करतात. त्यामुळे त्यांना गर्दीत मिसळण्यास मदत होते. या महिला अत्यंत मनमिळाऊ असतात. त्यांना प्रत्यक्ष चोरी करताना पकडले नाही तर त्यांच्यावर कोणीही संशय घेऊ शकणार नाही. तसेच त्या केवळ महिलांना लक्ष्य करतात, असेही पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

सोनसाखळी चोरीच्या वाढलेल्या घटना आणि सोन्याच्या भावात वाढ झाल्याने अनेक महिला सोन्याचे दागिने त्यांच्या पर्समध्ये ठेवतात. त्यामुळे महिलांचे पाकीट मारल्यास चोरट्यांचा अधिक फायदा होतो.

सहआयुक्त हिमांशू रॉय यांनीही पाकीटमारीच्या गुन्ह्यांत महिलांचा सहभाग वाढला असल्याचे मान्य केले. काम करणार्‍या महिलांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे या महिला लवकर चोरट्यांना बळी पडतात, असेही ते म्हणाले.

अख्खे कुटुंबच पाकीटमार
पाकीटमारी प्रकरणी महिलेला अटक झाल्यास अनेकदा त्यांचे संपूर्ण कुटुंबच यात सहभागी असल्याचे आढळून येते. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधनच ते असते. या कुटुंबातील सदस्यच महिलांना पाकीट मारण्याच्या क्लृप्त्या शिकवत असतात. पुरुषांना महिलांच्या डब्यात किंवा महिलांसाठीच्या रेस्टरूममध्ये जाता येत नाही. त्यामुळे महिलांना या गुन्ह्यांमध्ये सहभागी करून घेतले जात आहे.