Home | Maharashtra | Mumbai | 451 Grampanchayat Election on 23rd June

451 ग्रामपंचायतींसाठी 23 जूनला मतदान

प्रतिनिधी | Update - May 25, 2013, 04:54 AM IST

शुक्रवारपासून आचारसंहिता, 24 जूनला लागणार निकाल.

  • 451 Grampanchayat Election on 23rd June

    मुंबई - जुलै ते सप्टेंबर 2013 या कालावधीत मुदत संपणार्‍या 451 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी व काही रिक्त जागांसाठी 23 जून रोजी मतदान होणार असून संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.

    निवडणुकीसाठी 15 एप्रिल 2013 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असून नामनिर्देशन पत्रे 4 ते 8 जून 2013 या कालावधीत स्वीकारली जातील. 10 जून 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे 12 जून 2013 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरीत्या निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 23 जून 2013 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. दुसर्‍या दिवशी म्हणजे 24 जून 2013 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. आरक्षित जागेवर निवडणूक लढवणार्‍या व्यक्तीकडे जातपडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास नामनिर्देशनपत्रासोबत या समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा जोडणे आवश्यक राहील. त्याचबरोबर निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्रही उमेदवाराने देणे बंधनकारक असेल. सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान घेण्यात येईल. उमेदवारांना निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशेब सादर करणे आवश्यक आहे. तसेच निवडणुकीनंतर 30 दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. मुदतीत माहिती सादर न करणार्‍या उमेदवारांना अनर्ह ठरवण्यात येते, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही राज्य निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात आले.

    कुठे होणार निवडणुका?
    मतदान होणार्‍या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : ठाणे-9, रायगड-156, सिंधुदुर्ग-2, नाशिक-15, धुळे-6, जळगाव-7, नगर-72, पुणे-53, सोलापूर-2, सातारा-12, सांगली-30, कोल्हापूर-52, औरंगाबाद-2, नांदेड-7, परभणी-1, उस्मानाबाद-3, लातूर-5, अकोला-3, यवतमाळ-5, वर्धा-5, चंद्रपूर-1, गडचिरोली-3, एकूण-451.

Trending